नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उभारलेले बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला मंगळवारी सकाळी होण्याची चिन्हे आहेत. संदीप यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक मंगळवारी सकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बोलावली असून या बैठकीत ते पुढील निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा वाशी येथील नवी मुंबई स्पोटर्स क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घ्यावी’ अशी भूमीका मांडल्याचे समजते. असे असले तरी संदीप नाईक मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघातून भाजपचे नेते गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बहुचर्चित बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांची उमेदवारी कायम ठेवताना भाजपने नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांना मात्र धक्का दिला. साधारण वर्षभरापुर्वी पक्षाने संदीप यांच्याकडे भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद सोपविले होते. त्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यकारणीवर त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली होती. नवी मुंबईत नाईक आणि मंदा म्हात्रे या दोन भाजप आमदारांमध्येच विस्तव जात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनाही नाईक विरोधामुळे म्हात्रे या अधिक जवळच्या वाटतात. या पार्श्वभूमीवर बेलापूरची उमेदवारी म्हात्रे यांना जाहीर होताच संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकाविले असून मंगळवारी सायंकाळी आपल्या समर्थकांची एक बैठक वाशीतील भावे नाट्यगृहात त्यांनी आयोजित केली आहे.
बंडाची दिशा नेमकी कोणती ?
संदीप नाईक यांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षानेही अजून नवी मुंबईत आपले पत्ते उघड केलेले नाहीत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली हा उद्धव ठाकरे यांच्याकडे तर बेलापूर शरद पवार गटाकडे असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनी यापुर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. बेलापूरमधून संधी मिळाल्यास तुतारी हाती घेण्याचा संकल्पही त्यांनी सोडला आहे. परंतु संदीप नाईक यांच्या भूमीकेवर लक्ष ठेऊन असलेल्या पवारांनी अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दरम्यान मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच संदीप समर्थक माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकाऱ्यांची एक बैठक नवी मुंबई स्पोटर्स असोसिएशन येथे रविवारी रात्री बोलविण्यात आली होती. या बैठकीस काही समर्थकांनी शरद पवार यांच्या सोबत चला अशी भूमीका जाहीरपणे मांडल्याचे बोलले जाते. बेलापूरमधून अपक्ष निवडणुक लढविणे वाटते तितके सोपे नाही, अशी भूमीकाही काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे मांडली. मंगळवारी भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संदीप यांच्या बंडाची आगामी दिशा ठरेल असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मंदा म्हात्रे यांच्याविरोधात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असा निर्णय आम्ही घेतला आहे. असे असले तरी ही निवडणुक कोणत्या पक्षातून अथवा अपक्ष म्हणून लढवावी यावर अजूनही निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया संदीप यांचे कट्टर समर्थक असलेल्या एका माजी नगरसेवकाने लोकसत्ताला दिली. दरम्यान समर्थकांच्या एका मोठया गटाचे म्हणणे तुतारी घ्या असे असले तरी स्वत: नाईक मात्र अपक्ष म्हणूनच निवडणुक लढविण्यावर ठाम असल्याचे सुत्रांनी सांगितले.