Bhandara Assembly Election 2024भंडारा : काँग्रेसने भंडारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड विरोध असतानाही पूजा ठवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत सर्वच प्रमुख पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भंडारा मतदारसंघात दलित उमेदवारालाच संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. मात्र या विरोधाला न जुमानता काँग्रेसने नवीन चेहऱ्याला त्यातल्या त्यात महिला उमेदवाराला संधी दिली. यमुळे काँग्रेस नेत्यांसह बौद्ध समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर भंडाऱ्यासह तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे समीकरण बिघडवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार नरेंद्र पहाडे बंडखोरी करीत अपक्ष लढणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, महायुतीने शिवसेनेचे (शिंदे गट) नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आपली वेगळी चूल मांडण्याची तयारी चालवली आहे.

हेही वाचा >>>दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसकडे, २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

तुमसर विधानसभा क्षेत्राची जागा महायुतीतून राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मिळाली. तसेच महाविकास आघाडीतून शरद पवार गटाकडून माजी आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मेळावा घेऊन वाघमारे यांच्या उमेदवारीला विरोध केला. तसेच तिसरी आघाडी स्थापन करून आणखी उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे. त्यातच अजित पवार यांनी उमेदवारी देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याच्या कारणावरून धनेंद्र तुरकर यांनीही पक्षातून बाहेर पडत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

साकोलीबाबत ‘सस्पेन्स’ कायम

साकोली विधानसभेतही हीच स्थिती आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या दोन वेगवेगळ्या घटक पक्षांना उमेदवारी दिल्यामुळे जिल्हा भाजपमुक्त होण्याची चिंता आहे. त्यामुळे भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. साकोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारीबाबत ‘सस्पेन्स’ कायम असून भाजपला संधी मिळावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. पक्षश्रेष्ठींची यात मनधरणी करत साकोलीची जागा भाजपलाच द्या, अन्यथा, सर्व पदाधिकारी राजीनामा देणार असे राजीनामा शस्त्र त्यांनी उगारले आहे. यावर अजूनपर्यंत पक्षश्रेष्ठींनी कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बंडखोरी होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader