भंडारा : महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याला पहिले उपमुख्यमंत्री देणाऱ्या भंडारा जिल्ह्याला मागील दोन दशकांत मंत्रिपद मिळालेले नाही. २००४ ते २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांना काही महिन्यांसाठी, तर २०१६ मध्ये भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून गेलेले नागपूरचे डॉ. परिणय फुके यांना सहा महिन्यांसाठी राज्यमंत्रिपद मिळाले होते. तेवढा काळ वगळता भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षाच होती. यावेळी अपेक्षापूर्ती होणार, असे वाटत असतानाच जिल्ह्याला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली या तीन विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे नरेंद्र भोंडेकर (शिवसेना), राजू कारेमोरे (राष्ट्रवादी अजित पवार) व नाना पटोले (काँग्रेस) आमदार म्हणून निवडून आले आहेत. भोंडेकर आणि कारेमोरे हे महायुतीचे आमदार असल्याने त्या दोघांनाही मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले होते. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. भोंडेकर यांचे पालकमंत्रिपदाचे स्वप्न दुसऱ्यांदा भंगले. तरीदेखील ते मंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेतून आदळआपट करीत असून उपमुख्यमंत्री शिंदे यांना वेठीस धरताना दिसत आहेत.

हेही वाचा – ‘सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार’; विरोधकांनी राजकारण न करण्याचा फडणवीसांचा सल्ला

२०१४ ते २०१९ पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. शेवटच्या सहा महिन्यांत फुके पालकमंत्री होते. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सुनील केदार आणि विश्वजीत कदम यांच्या रुपाने बाहेरचे पालकमंत्री मिळाले, तर महायुती सरकारच्या पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळातही जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री लाभले. परजिल्ह्यातील असल्याने हे पालकमंत्री जिल्ह्याला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना एका विशिष्ट नेत्याच्या परवानगीची गरज असायची. यामुळे पालकमंत्री स्थानिकच असावा, अशी आशा सर्वांनाच होती.

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांनी भंडारा जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळवून दिले. त्यानंतर छेदीलाल गुप्ता, १९९०-९५ मध्ये आमगावचे भरत बहेकार (काँग्रेस) व अड्याळचे विलास श्रृंगारपवार, १९९५-९९ या काळात आमगावचेच प्रा. महादेव शिवणकर (भाजप) मंत्री होते. १९९९ ला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर १९९९-२००४ या काळात अड्याळ विधानसभा मतदारसंघाचे बंडू सावरबांधे (काँग्रेस) व त्यानंतर २००४-०९ या काळात नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी काही काळ राज्यमंत्रिपद भूषवले होते.

हेही वाचा – अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण २० टक्क्यांवर; यंदाच्या वर्षात १ लाख ३० हजार कोटींच्या मागण्या

पालकमंत्रिपदी कोण?

मंत्रिपदापासून उपेक्षित राहिल्याने जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बहुतांशवेळा बाहेरच्या मंत्र्यांकडेच राहिले. यामुळे पाहिजे तसा विकास झालेला नाही. आताही जिल्ह्याला बाहेरचाच पालकमंत्री मिळेल, हे स्पष्ट आहे. ते कोण असतील, याची उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara district no minister raju karemore narendra bhondekar bhandara news print politics news ssb