भंडारा : भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघावर महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसने दावा केला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटानेही ही जागा मिळविण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. शिंदे आणि ठाकरे गटातील इच्छुकांनी पक्षांची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध अपक्ष विरुद्ध अपक्ष, अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बौद्ध दलित मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे ९५ हजारांच्या घरात आहे. असे असतानाही २००९ पासून आतापर्यंत दलित समाजाच्या उमेदवाराला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे दलित समाजाच्या मतदारांनी यंदा समाजाच्याच उमेदवाराच्याच पाठिशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा : जागावाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत वाद; तुटेल इतके ताणू नये; उद्धव ठाकरे यांची अपेक्षा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरविंद भालाधरे (बौद्ध दलित) यांना जवळपास ८२ हजार मते मिळाली होती. ही मते केवळ बौद्ध दलित समाजाची होती. त्यावेळी भाजप आणि तेली समाज विरोधात गेल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयात या समाजाची महत्त्वाची भूमिका होती. आताही दलित बौद्ध समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हे २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले होते. सत्तांतरानंतर शिंदेंच्या शिवसेनेत सामील होताच त्यांची विधानसभेची उमेदवारी पक्की, असे भाकीत करण्यात आले. तेव्हापासून ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्यास या दोघांनीही अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हिंदू दलित आणि ओबीसी मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी नको! मुख्य सचिवांचे सर्व विभागप्रमुखांना आदेश

भोंडेकर यांच्यासमोर नाराजीचे आव्हान

भोंडेकर यांच्यासमोर नाराजीचे मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही, त्यामुळे आता त्यांना सहकार्य करणार नाही, अशी ठाम भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही आपली भूमिका कळवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नाही तर, ‘परिणय फुकेंमुळे मी भाजपमध्ये गेलो नाही,’ असे विधान करून भोंडेकर यांनी फुके समर्थकांनाही दुखावले. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच्या वैयक्तिक मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे. ही परिस्थिती पाहता यंदाची निवडणूक भोंडेकर यांना जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.