भंडारा : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. साकोली मतदारसंघात १३, भंडारा १९ आणि तुमसर मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बंडखोरांमुळे तीनही ठिकाणी तिरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. भंडारा आणि तुमसर येथील बंडखोरांना रोखण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचे दिसते. भंडारा मतदारसंघात ३१ पैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे विद्यमान आमदार शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसच्या पूजा ठवकर आणि शिवसेना उबाठाचे बंडखोर नरेंद्र पहाडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
साकोली मतदारसंघात मनोज बागडे, माजी आमदार बाळा काशिवार, देवचंद कावळे आणि जितेंद्र पारधी यांनी माघार घेतली. माजी आमदारांच्या माघारीत भाजपला यश आले असले तरी डॉ. सोमदत्त करंजेकर यांची बंडखोरी कायम असून ते रणांगणात असल्याने येथे चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहे. येथे कॉंग्रेसचे नाना पटोले, भाजपचे अविनाश ब्राम्हणकर आणि अपक्ष डॉ. करंजेकर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.
हेही वाचा : रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल
तुमसर मतदारसंघात २३ पैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे, शरद पवार गटाचे चरण वाघमारे आणि राष्ट्रवादीचे बंडखोर ठाकचंद मुंगूसमारे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. माजी आमदार सेवक वाघाये यांची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरणार आहे. माजी आमदार मधूकर कुकडे, नरेश ईश्वरकर, लक्ष्मीकांत सलामे, अनिल बावनकर यांनी अर्ज मागे घेतले आहेत. बंडखोरांमुळे तीनही मतदारसंघांत तिरंगी लढत होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहे. बंडखोर, अपक्षांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार असल्याने राजकीय पक्षांना टोकाचा जोर लावावा लागणार आहे, हे नक्की!
हेही वाचा : मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पटोले महाविकास आघाडीकडून साकोली विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीत अंतर्गत फूट पडल्यामुळे येथे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे बंडखोर सोमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. मात्र, करंजेकर त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने आता भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसमोर त्यांचे आव्हान असेल. भाजपमधील बंडखोरीचा फायदा कुणाला होणार, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd