अलिबाग : महायुती सरकारच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची अखेर एस टी महामंडळावर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला असला तरी ते मंत्री होऊ शकले नाहीत याची सल मात्र त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकात कायम आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती . पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी दिल्याने, गोगावले पुन्हा एकदा मंत्री पदाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असा आशावाद ते सतत व्यक्त करत राहीले. मात्र विधानसभा निवडणूक जवळ आली तरी गोगावले यांची मंत्री पदावर वर्णी लागली नाही. यावरून विरोधकांच्या टीकेचे ते धनीही ठरले. गोगावले यांच्या कोटला उंदीर लागण्यापूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करा अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली होती. विरोधकांकडूनही या मुद्द्यावर त्यांना लक्ष्य केले गेले.
आणखी वाचा-Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण
विरोधकांकडून होणाऱ्या टिकेनंतर गोगावले यांनी आपली मंत्री पदाची इच्छा कधी लपवून ठेवली नाही. याबाबत जाहीर कार्यक्रम असो अथवा पत्रकार परिषद ते कायमच बोलत आले. आपली मंत्री पदावर का वर्णी लागली नाही याचा किस्साही त्यांनी सांगितला होता. राज्यात महायुतीच्या स्थापने नंतर मंत्रीमंडळात माझे नाव होते. पण शिवसेनेच्या एका आमदारांने मंत्रीपद मिळाले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल असे सांगितले. दुसऱ्याने नारायण राणे मला संपवून टाकतील असे सांगितले. त्यामुळे त्या दोघांना मंत्रीपदे दिली गेली. तिसऱ्याने मला मंत्रीपद दिले नाही तर राजिमाना देण्याची धमकी दिली. त्याची संभाजीनगर मध्ये दोन मंत्रीपद दिली. तु घाई करू नको म्हणून समजूत काढली आणि कसेतरी थांबवले. आजकाल पंचायत समितीचे सदस्यपदही कोणी सोडत नाही, पण सरकार अडचणीत येईल आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी होईल म्हणून मी थांबलो असा रंजक किस्सा गोगावले यांनी सांगितला होता.
दुसऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात गोगावले यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सत्तेत सहभागी झाली, त्यांना नऊ मंत्रीपद दिली गेली. त्यामुळे शिवसेनेचे गोगावले पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीवर राहीले. नंतर नवरात्री, दिवाळी, हिवाळी आधिवेशनापूर्वी, लोकसभा निवडणूकीनंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल अशा वावड्या उठत राहील्या. पण विधानसभा निवडणूक आली तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही.
तेव्हा सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहीला असेल तर तो ही करावा लागेल असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली होती. माझ्या मंत्रीपदासाठी महादेवाला साकडे घाला असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले होते. गावकऱ्यांनी घातलेले साकडे काही प्रमाणात का होईना मान्य झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोगावले यांना एस टी महामंडळाचे अध्यक्ष पदावर वर्णी आहे आणि नावाला का होईना त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला.