मधु कांबळे
नांदेड : कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला चांगलीच गर्दी झाली होती. शेतकरी, सर्वसामान्य जनतेबरोबरच देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (अमेरिका) अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेत सहभागी झाले. परदेशातून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही परदेशात असलो तरी आमच्या हृदयात कायम मातृभूमीच आहे. आपल्या देशाची स्थिती अत्यंत वाईट आहे. राजकीय-सामाजिक ध्रुवीकरण होत असून समाजात फूट पडली जात आहे. त्याविरुद्ध राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही दाखल झालो आहोत. आम्ही ‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश घराघरात पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूयार्कमध्ये टाइम्स स्केअर ते युनियन स्केअरमधील गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी नुकतीच तीन किलोमीटर पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा दर्शविला होता. आज ते काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना भेटून यात्रेत सहभागी झाले. भारत माता कि जय…! ‘भारत जोडो’चे नारे देऊ लागले. नायगाव येथील प्रणिता प्रकाश कांबळकर ही बारा वर्षांची मुलगी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन रस्त्याच्या कडेला आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसहित उभी होती. मोदी सरकारने संविधान धोक्यात आणले आहे. ते वाचविण्यासाठी आम्हाला राहुल गांधींना पाठबळ द्यायचे आहे, असे तिने सांगितले.
लोहा गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे पाठविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अहो, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे. एकीकडे खते तीन हजाराने गोणी झालीय. तर शेतात कामगाराला माणसी रोजंदारी ५०० रुपये द्यावे लागतात. सरकारने एवढी महागाई वाढवून ठेवलीय कि त्यात एका हातातून शेतकऱ्यांकडून काढून घेतात आणि त्यातले थोडे आमचे आम्हालाच खात्यात परत देतात. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठीच आम्ही राहुल गांधींच्या सोबत यात्रेत आहोत, असे ते शेतकरी सांगत होते.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>> राहुल गांधींच्या सभेला जाणाऱ्या यात्रेकरूंसोबत रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक
केंद्रीय आणि राज्य पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकाश लांडगे अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरुणी हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. देशसेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. पण आम्हाला संधी मिळायला हवी, असे संध्या सानीने सांगितले. तर भरतीसाठी सराव करण्याऱ्या दोघीजणी जयराम रमेशजी यांना नजरेस पडल्या. त्यांची ती मेहनत बघून त्यांनी त्या दोघींना राहुल गांधी यांना भेटवले. तेव्हा राहुलजींना भेटल्याचा प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
तुपा, जवाहर नगरच्या वेशीवर शारदाबाई कदम या राहुलजी गांधींचे औक्षण करण्यासाठी उभ्या होत्या. त्याच्यासोबत गुलाबाची फुले घेऊन महिला आणि मुले उभी होती. त्याचबरोबर देवकीनंदन गोरक्षण आश्रमाच्या वतीने महिला पुरुषांसह सर्व सदस्य हार – आरती, झेंडे घेऊन आले होते. काकांडीच्या पुढे सायलो कोटलवार हे भटक्या जमातीतील तरुण कडकलक्ष्मीच्या पारंपरिक वेशात यात्रेत सहभागी झाले होते. आसूड ओढून घेत सर्वांचे लक्ष वेधत होते. त्यांना घर, हाताला रोजगार हवा आहे म्हणून ते राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी आले होते. महाराष्ट्राची वारकरी परंपरा दर्शविणारे दृश्य बाभळगाव येथे होते. वज्राशेक येथील गोविंद पाटील हायस्कूलच्या मुलांनी आदिवासी नृत्य आणि मुलींनी भजन सादर केले. युवा मिल्ट्री अकादमीच्या मुलांनी त्यांच्या गणवेशात सलामी दिली. तर नांदेडच्या देगलूर नाक्यावर पंजाबी बांधव पारंपरिक वेशभूषेत भांगडा नृत्य सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते.