‘भारत जोडो’ यात्रेत सुरक्षेचा भंग झाला असून हलगर्जीपणामुळे राहुल गांधींच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य सुरक्षाव्यवस्था पुरवली जावी, अशी मागणी करणारे पत्र पक्षाचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते. यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाने(सीआरपीएफ) उत्तर दिले आहे.
काँग्रेसच्या आरोपावर सीआरपीएफने उत्तर देताना सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधींनी अनेकदा विहित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. राहुल गांधी यांनी २०२० पासून ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. असे भारत जोडो यात्रेदरम्यानही घडले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसने गृहमंत्रालयास पाठवलेल्या पत्राचे उत्तर देताना सीआरपीएफने सांगितले की, निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षाप्राप्त व्यक्तीसाठी सुरक्षा तोपर्यंत राहते, जोपर्यंत ती व्यक्ती सुरक्षा नियमांचे पालन करतो. २०२० नंतर राहुल गांधींद्वारे सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांचे ११३ वेळा उल्लंघन झाले आहे. याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांनी आरोप केला की, भारत जोडो यात्रेच्या दिल्ली टप्प्यातही राहुल गांधीं सुरक्षा नियमांचे उल्लघंन करत आहेत.
‘राहुल गांधींना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून यात्रेमध्ये सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्याभोवती पोलिसांची साखळी उभी केलेली असते. त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी हे सुरक्षा कडे तोडून लोक राहुल गांधींच्या जवळ जाऊ शकत नाहीत. ‘भारत जोडो’ यात्रेने दिल्लीत प्रवेश केल्यानंतर, लोकांची अलोट गर्दी झाली होती. यात्रा लालकिल्ल्याकडे निघाली असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यांनी राहुल गांधींभोवती सुरक्षा साखळी उभी केली नाही. गर्दी अस्ताव्यस्त झाली, धक्काबुक्की झाली, लोक खाली पडले. पोलिसांनी लोकांना नियंत्रित करण्यासाठी काही केले नाही, असा दावा प्रवक्ता पवन खेरा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रामध्येही दिल्ली पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल तक्रार करण्यात आली आहे.
‘भारत जोडो’ यात्रेचा पुढील प्रवास पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यांमधून होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राहुल गांधी व अन्य यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.