भारत जोडो यात्रा सध्य शेवटच्या टप्प्यात असून, जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेने प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या लोकांना भावनिक साद घातली. त्यांनी म्हटले की, “माझे पूर्वज या भूमीशी जुडलेले होते. मला वाटतं की मी माझ्या घरी परत आलो आहे. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांचे दु:ख जाणतो आणि नतमस्तक होऊन तुमच्याकडे आलो आहे. येथील लोकांचे दु:ख वाटून घेण्यासाठी मी आलोय, मला माहीत आहे की इथे प्रत्येकजण दुखावला गेला आहे.”
“जम्मू-काश्मीरला पोहचत असल्याचा खूप आनंद आहे. कारण, माझ्या घरी जात आहे, जिथे माझ्या पूर्वजांचे मूळ जुडलेलं आहे आणि शिकतोय, समजतोय, स्वत:ला, प्रत्येक प्रदेशाला, आपल्या देशाला.” असं राहुल गांधी ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.
पठाणकोट-पंजाब येथून जम्मू-काश्मीरच्या प्रवेशद्वारावर मोठ्यासंख्येने उपस्थित जनसमूदायास संबोधित करताना, राहुल गांधी म्हणाले “मी त्या ठिकाणी परत आलो आहे, जिथून माझं कुटुंबं उत्तर प्रदेशला गेलं होतं. जेव्हा कोणी आपल्या मूळ ठिकाणाकडे जातो तेव्हा त्याला स्वत:बद्दल, आपल्या लोकांबद्दल आणि देशाबद्दल खूप काही शिकायला मिळते.”
३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. राहुल गांधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावतील. २० ते ३० जानेवारी या दहा दिवसांच्या काळातील पदयात्रेमध्ये किती संख्येने लोकांना सहभागी होता येईल, दररोज किती किमी पदयात्रा करता येईल आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांचा प्रशासन विचार करत असल्याचे समजते.