मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नायगाव (नांदेड ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक, आर्थिक विषमता निर्माण करण्याच्या तसेच राजकीय हुककूमशाहीच्या राजकारणाविरोधातील लढाई आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. सकाळी पावणे सहा ते नऊ पर्यंत पहिल्या टप्प्यातील पदयात्रा पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रेची आतापर्यंतची वाटचाल, जनतेमधून मिळणारा प्रचंड प्रतिसाद याची माहिती दिली. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, तसेच कन्याकुमारीपासून यात्रेत सहभागी झालेले देशातील एकूण १४० भारत यात्रीमधील महाराष्ट्रातील नऊ यात्री उपस्थित होते.

हेही वाचा : अकोला जिल्ह्यात शिवसेनेपुढे संघटनात्मक वाढीचे शिवधनुष्य; आदित्य ठाकरेंचा दौरा परिणामकारक ठरणार?

भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्त्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे जयराम रमेश म्हणाले.कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली ही पदयात्रा देशातील विदारक परिस्थिती जनतेला अवगत करण्यासाठी आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, समाजिक धृवीकरण व राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. राहुल गांधी दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत आहे. लोकांमध्ये राहुल गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भारतीय जनता पक्ष व आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभर एकच पक्ष सामना करू शकतो तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह यांचा पुणे दौरा आणि मनसेची अडचण

महाराष्ट्रातील ९ यात्रींचा सहभाग

देशभरातील १४० भारतयात्रींमध्ये या पदयात्रेत राहुलजी गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी आहेत. महाराष्ट्रातील ९ भारतयात्री सहभागी आहेत. डॉ. मनोज उपाध्याय, नवी मुंबई, नंदा म्हात्रे, रायगड, आतिषा पैठणकर, नाशिक, रोशनलाल बिट्टू, चंद्रपूर, पिंकी राजपूत, नागपूर, प्रेरणा गौर, चंद्रपूर, श्रवण रपनवाड, नांदेड, महेंद्र बोहरा, नागपूर व वैष्णवी भारद्वाज, नागपूर हे भारत यात्री सहभागी आहेत. यांचा परिचय या वेळी करुन देण्यात आला.

ही लोकचळवळ : अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उद्या १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत तर ११ तारखेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत.