राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांव्यतिरिक्त समाजसेवक, अभिनेते तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभाग नोंदवत आहेत. दरम्यान खासदार राहुल गांधी नेतृत्वातील या यात्रेमध्ये दिनेश शर्मा नावाच्या एका खास व्यक्तीची भारतभरात चर्चा होत आहे. ते राहुल गांधी यांचे चाहते असून २०११ सालापासून अनवाणी पायांनी चालतात. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
हेही वाचा >>> Gujarat Election 2022 : भाजपाच्या जाहीरनाम्यावर काँग्रेस, आपची टीका; ‘झेरॉक्स कॉपी’ म्हणत उडवली खिल्ली
कोण आहेत दिनेश शर्मा?
दिनेश शर्मा मूळचे हरियाणा राज्यातील आहेत. त्यांनी कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. ते राहुल गांधी यांचे चाहते आहेत. २०११ सालापासून ते अनवाणी पायाने चालतात. काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या जाहीर सभांना ते आवर्जून हजेरी लावतात. जेव्हापासून भारत जोडो यात्रा सुरु झालेली आहे, तेव्हापासून ते या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत चालतात.
हेही वाचा >>> UP Civic Polls : गुजरातमध्ये स्टार प्रचार असणाऱ्या योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात
“मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचे आहे. आम्ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी ऐकलेले आहे. त्यांनी देशासाठी आपला प्राण दिला. जवाहरलाल नेहरू यांनीदेखील देशाला भरपूर दिले. त्यानंतर आता मला राहुल गांधी यांच्यात देशाचे भवितव्य बदलण्याची क्षमता दिसते. याच कारणामुळे राहुल गांधी यांना पाठिंबा द्यायचा आहे. जोपर्यंत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत माझी ही तपश्चर्या सुरुच राहील,” असे दिनेश शर्मा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> “भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!
दरम्यान, दिनेश शर्मा यांना राहुल गांधी ओळखतात. शर्मा राहुल गांधी यांच्या प्रत्येक सभेला हजेरी लावायचे. याच कारणामुळे २०१२ साली राहुल गांधी यांनी शर्मा यांच्याशी बातचित केली होती. तेव्हापासून राहुल गांधी शर्मा यांना ओळखतात. राहुल गांधी यांच्या प्रत्येक सभेला ते उपस्थित राहण्यासाठी ते स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करतात.