काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हैदराबादमधील चारमिनार समोर काल तिरंगा ध्वज फडकवला. जवळपास ३२ वर्ष अगोदर त्यांचे वडील आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनीही याच ठिकाणाहून सद्भावना यात्रा सुरू केली होती. काल जेव्हा राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज फडकवला तेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, दिग्विजय सिंह, तेलंगणा प्रेश काँग्रेस समिती(टीपीसीसी) अध्यक्ष रेवंथ रेड्डी उपस्थित होते. राहुल गांधी हे भारत जोडोची घोषणाबाजी आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या लोकांच्या गर्दीमधून चारमिनारला पोहचले होते.
या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘३२ वर्षांपूर्वी वडिलांनी चारमिनार येथून सद्भावना यात्रा सुरू केली होती. भारताची एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले होते. सद्भावना मावतेचे सर्वात अद्वितीय मूल्य आहे. मी आणि काँग्रेस पक्ष याला कोणत्याही फुटीरतावादी शक्तीसमोर कोसळू देणार नाही.’
यावेळी चारमिनारकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पक्षाच्या झेंड्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी राहुल गांधी यांनी मंचावर ठेवण्यात आलेल्या त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या प्रतिमेस फुलं वाहून श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी राहुल गांधींनी तिरंगा ध्वज फडकवला आहे, त्याच ठिकाणाहून १९ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचे वडील राजीव गांधी यांनी सद्भवाना यात्रेस सुरुवात केली होती. दरवर्षी काँग्रेस या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवत असते. यंदा १९ ऑक्टोबर रोजी आम्ही इथे तिरंगा फडवू शकलो नव्हतो, त्यामुळे मंगळवारी आम्ही राष्ट्रध्वज फडकवला आहे.
नक्की पाहा – PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळीराजाच्या भूमिकेत; गावाकडील शेतात रमले
चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री पूजा भट्टने काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत बुधवारी हैदराबादमध्ये सहभाग घेतला. तेलंगणा काँग्रेसने भट्ट यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या यात्रेत खासदार राहुल गांधी आणि तेलंगणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या उत्साहात भट्ट सहभागी होताना दिसत आहेत.
हुसैनीआलम, चारमिनार, मदिना सर्कलपासून इंदिरा गांधींच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर आयमॅक्स सर्कलपर्यंत आठ किलोमीटरची ही पदयात्रा होती. यात्रेच्या ५६ व्या दिवशी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. काँग्रेसची ही पदयात्रा सात सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरू झाली आहे. तेलंगणात पोहोचण्याआधी या यात्रेने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये प्रवास केला आहे.