पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ने (बीआरएस) महाराष्ट्रात प्रवेश केल्याची दखल सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी लागली असताना, या पक्षाने पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यात चंचूप्रवेश करण्यासाठी ‘फलकबाजी’ सुरू केली आहे. स्वपक्षात नाराज असलेले राजकीय नेते ‘बीआरएस’च्या गुलाबी रंगात रंगण्यासाठी तयारीला लागले असून, प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘मोठे मासे’ गळाला लागल्याचा दावा ‘बीआरएस’च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ‘बीआरएस’ने पुण्यात वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात फलकबाजीने झाली आहे. शहरात प्रमुख ठिकाणी ‘बीआरएस’चे फलक झळकू लागले आहेत. तसेच या पक्षाने ऑनलाइन सभासद नोंदणीला प्राधान्य दिले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची पुण्यात जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रद्रर्शन करण्याचेही नियोजन ‘बीआरएस’च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुण्याचा मध्यवर्ती पेठांचा भाग वगळता उपनगरी परिसर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुसंख्य मतदार हे शेतीशी संबंधित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘बीआरएस’हा पर्याय असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

हेही वाचा – मराठवाड्यातील शिंदे गटाचे तीन मंत्री पुन्हा चर्चेत

स्वपक्षामध्ये स्थान मिळत नसल्याने किंवा पदापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे पुण्यातील अनेक नेते नाराज आहेत. राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना ‘बीआरएस’ हे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आतापासून काही राजकीय नेत्यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी असले, तरी प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे ‘बीआरएस’कडून सांगण्यात आले.

हेही वाचा – जमाखर्च : गुलाबराव पाटील; ‘पाणीवाले बाबां’च्या मतदारसंघातच पाण्याची टंचाई !

याबाबत ‘बीआरएस’चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जी. देशमुख म्हणाले, ‘‘पक्षाने राज्यभर प्रचार आणि पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात तेलंगणा राज्य कसे यशस्वी झाले, हे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या ऑनलाइन सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे साडेआठ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. राज्यातील प्रमुख ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. अन्य पक्षांतील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून संपर्क साधण्यात येत आहे. आगामी काळात पक्षप्रवेशाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये काही मोठ्या नेत्यांचाही समावेश असणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat rashtra samiti focus is now on pune print politics news ssb