संजीव कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना अलिकडे भारतरत्न जाहीर करून त्यांचा मरणोत्तर सन्मान केला. पण रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील राव यांचा पूर्णाकृती पुतळा अजूनही अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे.

यंदाच्या निवडणूक वर्षात केंद्र सरकारने प्रथम बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केले. त्यानंतर माजी पंतप्रधान दिवंगत चरणसिंह चौधरी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांनाही सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्यानंतर या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले होते. मोदी यांचाच पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे, पण राज्यातील भाजप नेत्यांनी राव यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या विषयात आस्था दाखविली नसल्याचे वरील विद्यापीठातल्या एका माजी अधिकार्‍याने सोमवारी सांगितले.

हेही वाचा… चंद्रपूर जिल्हा भाजप कार्यकारिणीवर मुनगंटीवारांचे वर्चस्व, हंसराज अहीर समर्थकांना डावलल्याने नाराजी

तेलंगणा राज्य तसेच मराठवाड्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली पी. व्ही. नरसिंह रावांनीही मोठे योगदान दिले होते, पण अमृतमहोत्सवी वर्ष गेल्या सप्टेंबरमध्ये संपले, तरी राव यांचा पुतळा सुरक्षित आवरणातून खुला झाला नाही.

वरील विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्या कार्यकाळात नरसिंह राव यांचा पुतळा स्थापित करण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली. नंतरचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी राव यांच्या मुलाकडून पूर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात मिळवला. तसेच त्यांनी या पुतळ्याच्या अनावरणासाठी प्रयत्नही केले. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०२२च्या नागपूर अधिवेशनादरम्यान कोश्यारी यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा… चावडी: अशोकपर्व

त्यानंतर आता १४ महिने लोटले आहेत. विद्यापीठात कुलगुरू आणि कुलसचिव ह्या दोन्ही पदांवर नव्या व्यक्ती कार्यरत आहेत. केंद्र सरकारने भारतरत्नने गौरविलेल्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी विद्यापीठातल्या नव्या कारभार्‍यांनीही प्रयत्न केले नसल्याचे सांगितले जात आहे.

रामटेकच्या विद्यापीठातील नरसिंहराव याच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या विषयात अशोक चव्हाण यांनी ते काँग्रेस पक्षात असताना, आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण नरसिंह राव यांचे मित्र आणि सहकारी होते. या पार्श्वभूमीवर राव यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या विषयात अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना विद्यापीठाच्या माजी अधिकार्‍याने केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat ratna p v narasimha rao statue in kavikulaguru kalidas sanskrit university ramtek is still waiting for unveiled print politics news asj
Show comments