नागपूर : नागपूर शहरात एका आमदारापासून सुरवात केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज चार आमदार आहेत. त्यापैकी एक राज्याचा मुख्यमंत्री आहे. खासदार भाजपचा आहे. ते केंद्रात मंत्री आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सुध्दा जिल्ह्यातील आहेत. उद्या रामनवमीला भाजपचा ४६ वा स्थापना दिवस असून या मुहुर्तावर पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. देशभराप्रमाणे नागपुरातील भाजपचा आलेख चढताच राहिला आहे.
नागपूर संघाचे मुख्यालय असले तरी १९९० पर्यंत भाजपला येथे विधानसभा निवडणूक जिंकता आली नन्ही. कॉंग्रेसचा बालेकिल्ला हीच नागपूरची ओळख होती. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा सर्वत्र कॉंग्रेसचे वर्चस्व होते पण भाजपने कधी प्रयत्न सोडले नाही.
पक्षाचे स्थानिक दिग्गज निवडणुकीच्या राजकारणात पराभूत होत होते. पण डाव्या पक्षाप्रमाणेच उजव्या विचारसरणीच्या भाजपने कधीतरी आपले दिवस येतील या आशेने काम सुरू ठेवले. विशिष्ट लोकांचाच पक्ष ही प्रतिमा तोडून बहुजन समाजाला सोबत घेणे सुरू केले आणि नागपुरात पहिल्यांदा म्हणजे १९९० ला विनोद गुडघे पाटील यांच्या रुपात पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आला.
१९९६ मध्ये पहिल्यांदा बनवारीलाल पुरोहित यांच्या रुपात भाजपचा खासदार नागपुरातून निवडून आला . विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातून नितीन गडकरी निवडून आले. भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढवणे सुरू केले. १९९१ मध्ये महापालिका जिंकली. देवेंद्र फडणवीस भाजपचे पहिले महापौर झाले. त्यानंतर भाजपने मागे वळून पाहिले नाही.
सलग १५ वर्ष महापालिकेवर भाजपची सत्ता होती. नागपूर मध्ये भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. फडणवीस सलग पाचव्यांदा निवडून आले. २०१४ मध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला तोही नागपूरचा होता २०२५ मध्ये ही संधी नागपूरला मिळाली. गडकरी यांच्या रुपात सलग तीन वेळा भाजपचा खासदार निवडून येत आहे. गडकरी यांच्या रुपात केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूरला स्थान आहे. पक्षाच्या स्थापना दिनी पक्षाचे नवीन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. पुढच्या काळात पक्षाचा आलेख चढता राहील की घसरण होईल हे काळ ठरवेल.