पालघर प्रचारात प्रमुख मुद्दे काय आहेत?
आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत, त्यामुळे पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच मुख्य मुद्दा आहे. १० वर्षे झाली तरी नागरी, डोंगरी, सागरीभागात अपेक्षित विकास झालेला नाही. जाहीरनाम्यात नमूद सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढवण बंदर रद्द करण्याचा निश्चय. मुरबे येथे होऊ पाहत असलेले बंदर हे भूमीपुत्राच्या विरोधात असल्यास त्याला आमचा विरोध राहील. बुलेट ट्रेन, द्रुतगती महामार्ग संबंधीत मुद्दे आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांनी सुसज्ज मुंबईप्रमाणे प्रशस्थ जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, जव्हार, मोखाडासह जिल्ह्यातील विविध भागातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, वीजेचे प्रश्न आजही गहन आहेत. महिला बचत गटांना अर्थसहाय्य देऊन आणखी सबळ करायचे आहे. स्थलांतर, रेल्वे, पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, कुपोषणाचा मुद्दा, जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हावी, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा असे अनेक मुद्दे आमच्या प्रचारात समाविष्ठ आहेत.
शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार?
या फुटीचा काहीही परिणाम होणार नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधी मंडळींना उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी संधी देऊन आणि कार्यकर्त्यांनी प्रचार करून लोकप्रतिनिधी बनवले होते. मात्र ते जरी गेले तरी सामान्य निष्ठावंत कार्यकर्ता आजच्या खऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी सोबत आहेत. सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आजही आमच्या नेत्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत आणि लढत आहेत.
हेही वाचा…उमेदवारांची भूमिका : ईशान्य मुंबई मतदार संघ, नाहक भाषिक वाद पेटविला जात आहे – मिहिर कोटेचा
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मते कशी मिळवणार?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वलय आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली कामे व करोनामध्ये मिळवलेलं अभूतपूर्व यश पाठीशी आहे. तसेच मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना करोनाच्या लाटेच्या वेळी जिल्ह्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी सगळी यंत्रणा मी स्वतः हाती घेतली होती. ग्रामीण भागात अनेक पाणी योजना मी त्या ठिकाणी आणल्या, ग्रामीण भागात वाढत असलेलं कुपोषण कमी करण्यासाठी मी अध्यक्षप्रमाणे नव्हे तर एका आईप्रमाणे काम केले. म्हणूनच ग्रामीण भागातील मतदार मला माझ्या कामाची व शिवसेनेला संघर्षाची पोचपावती नक्की देणार असा मला विश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठलाच जात, धर्म न बघता महाराष्ट्र एकसंघ ठेवला. मी आदिवासी महिला आहे. माझी जात न बघता मला लोकप्रतिनिधी म्हणून १० वर्षे काम करायची संधी दिली. लोकसभा संघटक म्हणून पक्षाचे पद दिले. म्हणूनच अल्पसंख्याक व दलित समाज हा आमच्या सोबत आहे.
हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : दक्षिण मुंबई, शिंदे गटासाठी उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा अडचणीची ठरणार ?
कुठल्या पक्षाचे आव्हान वाटतेय?
महाविकास आघाडी सोबत असल्यामुळे कुठल्याच पक्षाचे आव्हान त्या ठिकाणी वाटत नाही. कारण आमची लढाई ही विकासासाठी आहे. जिल्ह्याचा विकास करणे हे एक मोठं आव्हान असल्यामुळे ते कसे करता येईल याकडे आमचे जास्त प्रयत्न आहेत.