छत्रपती संभाजीनगर : ‘औरंगजेबाला खुलताबाद येथे गाढले गेले नाही. तर त्याचा मृत्यू अहिल्यानगरमध्ये झाला आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला खुलताबाद येथे आणून त्याचे थडगं उभे करण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेशी शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष सहमत नाही. तसेच भैय्याजी जोशी यांना जरी औरंगजेब अनावश्यक वाटत असला तरी त्यांच्या भूमिकेला विरोध नाही पण आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने औरंगजेबची कबर काढून टाकायला हवी,’ हे आमचे मत ठाम आहे, अशी भूमिका शिवसेना प्रवक्ते व समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली. त्यामुळे रा. स्व. संघाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली आहे.
शिरसाट यांनी मांडलेली ही भूमिका छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाला पुरक आणि पोषक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. संभाजीनगरच्या राजकारणात नेहमीच हिंदू – मुस्लिम असे विभाजन पहावयास मिळाले आहे. कोण अधिक आक्रमक, अशी अहमहमिका शिवसेना आणि भाजपमध्येही फुटीपूर्वीही सुरू असे. आजही आम्हीच अधिक आक्रमक आहोत, हे दर्शविण्यासाठी संजय शिरसाट यांनी मोघल बादशहाची कबर हटविण्याची भूमिका पुन्हा एकदा मांडली.

ठाण्यानंतर एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक बळ मिळाले ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य या पाच मतदारससंंघात शिवसेनेचे आमदार आहेत. मुस्लिम विरोधाच्या पायावर उभ्या असणाऱ्या या मतदारसंघात अधिक कट्टर भूमिका घेणे आवश्यक असल्याने संजय शिरसाट यांनी थेट रा. स्व. संघ आणि राज ठाकरे यांच्याशी फारकत घेणारी भूमिका मांडली. औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर स्वाभिमानास आव्हान असल्याने ती कबर नकोच, अशी भूमिका शिरसाट यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदू – मुस्लिम असा राजकीय पट कायम रहावा असा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा होरा कायम असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या राजकारणात भागातून २६ ते २७ मुस्लिम नगरसेवक निवडून येतात. मजलिस – ए – इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएम या पक्षाने शहराच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून ही संख्या नगरसेवकांची संख्या एकत्रित झाली. त्यामुळे निर्माण होणारा राजकीय पट विस्कळीत होऊ नये म्हणून संजय शिरसाट यांनी रा. स्व. संघाच्या भूमिकेशी फारकत घेणारी भूमिका व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

स्थानिक पातळीवरील या भूमिकेमुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांची मात्र राज्याच्या पातळीवर कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ औरंग्या’ असा उल्लेख करत संजय शिरसाट म्हणाले, ‘ त्याला इथे गाडलं गेलं नाही. तर त्याची कबर त्याने स्वत:हून येथे असावी असं म्हटलं होतं. त्याच्या इच्छेने हे झाले आहे.त्यामुळे कबर काढून टाकायला हवी.’