पुणे : मुंबईत नवीन योजनेची घोषणा करायची आणि त्याचा आरंभ पुण्यात करण्यावर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) महायुती सरकारने भर दिला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या पहिल्या पात्र महिलांना लाभ देण्याचा कार्यक्रम राबविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आणि केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागाची बैठक घेण्यात आली. आता राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमाची झाडाझडती पुण्यात घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारीला मंत्रालयात बैठक घेऊन राज्याच्या प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी ही उद्दिष्टे देऊन प्रत्येक विभागांना आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची या आठवड्यात पुण्यात बालेवाडी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आढावा घेऊन झाडाझडती घेतली जाणार आहे. दोन दिवस नियोजन केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक विभागाची झाडाझडती घेण्याबरोबरच राजस्तरीय धोरणांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी कसा समन्वय साधायचा, यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत प्रत्येक विभागाचे प्रमुख हे आपापल्या विभागांकडून कोणकोणत्या योजना राबविण्यात आला, याचे सादरीकरण करणार आहेत. तसेच त्यांच्याकडून नवीन संकल्पना मांडून त्यावर चर्चा केली जाणार आहे. आगामी काळातील योजनांचा आराखडा या बैठकीत निश्चित होणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, मुंबईत महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करून त्याचा पुण्यात गाजावाजा करत प्रारंभ करण्यावर महायुती सरकारने भर दिल्याचे दिसून येते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर झाल्यानंतर पहिल्या पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याचा राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम हा १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाला होता. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-२ मध्ये राज्यात २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात झाला. केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोरेगाव पार्क भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित होते. आता राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची पुण्यात झाडाझडती घेतली जाणार आहे.