लक्ष्मण राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जालना : भास्कर अंबेकर हे विद्यार्थी संसदेचे राजकारण करीत असताना सामाजिक कार्यात आणि पुढे राजकीय क्षेत्रात पदार्पण केलेले जालना जिल्ह्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व. जालना शहरातील जे.ई.एस.महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून त्यांचा अनेक नेतेमंडळींशी संबंध आला. विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत महाविद्यालयीन पातळीवरील मतदानाच्या एका प्रकरणी त्यांनी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबादत खंडपीठात धाव घेतली होती. त्या वेळी हे प्रकरण गाजले होते. विद्यार्थी असतानाच त्यांनी स्थानिक पातळीवरील नागरी सुविधा त्याचप्रमाणे अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलने केली. व्यायामशाळा त्याचप्रमाणे विविध क्रीडा प्रकारांशी त्यांचा विद्यार्थिदशेपासून संबंध राहिला. विविध उपक्रमांच्या माध्यमांतून त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार, नवरात्रोत्सवात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, कीर्तन महोत्सव, गरजूंना मदत इत्यादी अनेक माध्यमांतून अंबेकर यांनी कार्य केलेले आहे. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा जालना नगर परिषदेच्या सदस्यपदी निवडून आले. त्यानंतर जवळपास २५ वर्षे ते या पदावर होते. १९९६ मध्ये एक वर्षासाठी त्यांची जालना नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर २००१ मध्ये थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले.

हेही वाचा… सुनील टिंगरे : युवकांमध्ये लोकप्रिय

पाच वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केली.मोतीबागेचा विकास, जलतरण तलाव, अनेक समाजमंदिरे, नवीन रस्त्यांची कामे आणि जालना शहरासाठी थेट जायकवाडी जलाशयातून घेण्यात आलेली पाणीपुरवठा योजना इत्यादींमुळे त्यांचा हा कार्यकाळ उल्लेखनीय ठरला. नगर परिषदेच्या माध्यमातून पुढे त्यांचे जालना शहर आणि जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अस्तित्व निर्माण झाले. १९९१ मध्ये नगर परिषदेच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानंतर दोन वर्षांत त्यांची शिवसेनेच्या जालना शहरप्रमुख पदावर नियुक्ती झाली आणि सहा वर्षे ते या पदावर राहिले. त्यानंतर पाच वर्षे ते पक्षाचे जिल्हा उपप्रमुख होते. २०११ पासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.

हेही वाचा… अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असतानाच त्यांनी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ व्यायाम मंदिर व क्रीडा मंडळ, आधार चॅरिटेबल ट्रस्ट इत्यादी संस्थांची स्थापना केली. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदावरही ते पाच वर्षे राहिले. राजकीय क्षेत्राप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबवल्यामुळे त्यांचा स्वपक्षासह अन्य पक्षांतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संपर्क वाढलेला आहे. एकदा शिवसेनेने त्यांना विधानसभेची उमेदवारीही दिली होती. परंतु या निवडणुकीत विजय मिळाला नाही. भास्कर अंबेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष ठेवून त्यांची जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar ambekar linking social work to politics print politics news asj