रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांना दिलेला निर्वाणीचा इशारा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी वापरलेले दबाव तंत्र असल्याचे दिसून येत आहे. स्वत:ला चिपळूण तर मुलाला गुहागरमधून उमेदवारी मिळावी, असा जाधवांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात आमदार जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहनवजा पत्र पाठवून, रविवारी (१० मार्च) आयोजित मेळाव्याचं आमंत्रण दिलं. ‘मला तुमच्याशी काही बोलायचं आहे,’ अशी सुरुवात करून लिहिलेल्या या खुल्या पत्रामध्ये त्यांनी थोडक्यात आपल्या भावनांनाही वाट करून दिली आणि या संदर्भात मोकळेपणाने बोलण्यासाठी यावं, असं आवाहन केलं. त्यानुसार गेल्या रविवारी चिपळूणमध्ये हा मेळावा झाला. याप्रसंगी जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेताना, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधी काही केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी मंत्री होतो, मात्र ज्येष्ठता असूनही मला शिवसेनेत आल्यावर मंत्रिपद दिले नाही. मी त्यावेळी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली नाही आणि यापुढेही असे काही बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी मनातले शल्य उघड केले. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या‌ कार्यपद्धतीबद्दलची नाराजी या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून आली.

Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

हेही वाचा – पासवान आणि मंडळींना सांभाळताना भाजपाची दमछाक

आमदार जाधव यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर गेल्या सुमारे ३५-४० वर्षांच्या काळात शिवसेनेमध्ये दोन वेळा आमदारकीसह त्यांना विविध पदे मिळाली. पण २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अर्थात त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुमारे वर्षभराने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचे सरकार होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे १५ वर्षांच्या कारकिर्दीत मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसह विविध पदे भोगल्यानंतर जाधवांनी २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाट्यमय घडामोडी होऊन राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेवर आली. या आघाडीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जाधव यांचे परंपरागत राजकीय विरोधक उदय सामंत यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले. पण, इतर अनेक समकालीन राजकीय नेत्यांपेक्षा जास्त उजवे कर्तृत्त्व, संघटन कौशल्य, झपाटून काम करण्याची क्षमता, प्रभावी वक्तृत्त्व, हजरजबाबीपणा हे सारे गुण असूनही आमदार जाधव उपेक्षित राहिले. याचे मुख्य कारण, त्यांची एकांडी शिलेदारी वृत्ती. राजकारणात काही वेळा पडते घ्यावे लागते. प्रसंगी शत्रूशीही जुळवून घ्यावे लागते आणि योग्य संधीची वाट पाहावी लागते, ही तत्त्वे त्यांना नामंजूर असतात. त्यामुळे गेले तेथे त्यांनी शत्रूच जास्त निर्माण केले आणि यालाच त्यांनी मेळाव्यात ‘संघर्ष’ असे संबोधून आपल्यावरील ‘अन्याया’चे दु:ख मोकळे केले.

मुलाच्या उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन

सुमारे दीड वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडून महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर आता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पाठोपाठ आणखी जेमतेम सहा महिन्यांनी राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत स्वतःसाठी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याबरोबरच आपले चिरंजीव विक्रांत यांना गुहागर मतदारसंघातून उमेदवारी मिळवणे, हे आमदार जाधव यांचे लक्ष्य आहे आणि त्या दृष्टीने राज्यातील इतर सर्वपक्षीय महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.‌ रविवारचा मेळावा हा त्या दृष्टीने, म्हटले तर कार्यकर्त्यांची चाचपणी, म्हटले तर शक्ती प्रदर्शन, अशा स्वरुपाचा होता.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

तसे पाहिले तर राज्यात सध्या विविध राजकीय पक्षांचे निवृत्तीच्या टप्प्यावर आलेले बहुतेक नेते याच पद्धतीने आपल्या वारसदारांच्या राजकीय उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहेत. फक्त कोकणापुरते बोलायचे झाले तरी सध्या केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे त्यांच्या दोन मुलांसाठी खटपटीत आहेत. जाधव यांचे कट्टर विरोधक आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आमदार चिरंजीव योगेश यांच्यासाठी भाजपा विरोधात किती टोकाला जाऊन आटापिटा करत आहेत, हे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात आमदार जाधव यांना उमेदवारीसाठी स्पर्धक असलेले रोहन बने यांना, शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या मांडवांखालून फिरून आलेले माजी आमदार सुभाष बने यांचे पाठबळ आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जाधवांनी निर्वाणीचा इशारा दिलेल्या त्यांच्या पक्षप्रमुखांनाही आपल्या युवराजांना गादीवर भक्कमपणे बसवायचे आहे.

हे सार्वत्रिक चित्र पाहता आमदार जाधव यांनी तशी आकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही. शिवाय त्यांचे चिरंजीव विक्रांत यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कामगिरी त्या दृष्टीने नक्कीच नोंद घेण्यासारखी झाली आहे. त्यामुळे ते ‘बढती’साठी निश्चितपणे पात्र आहेत. पण त्या दृष्टीने व्यूहरचना करताना अशा प्रकारे मेळावा घेऊन जाहीरपणे नापसंती व्यक्त करणे, एवढेच नव्हे तर, पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यामुळे आमदार जाधव आपले प्रगतीपुस्तक आणखी खराब करून घेत आहेत. त्यामुळे त्यांचे उद्दिष्ट जवळ येण्याऐवजी दूर जाण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय, त्यांना अन्यत्र कुठे जायचे असेल तर तीही वाट खडतर झाली आहे.

Story img Loader