नांदेड : माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या राजवटीत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचित तोट्यातून बाहेर पडल्याची माहिती नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाहेर आली. जिल्हा पातळीवरील नांदेड बँकेसंदर्भात आनंददायी घटना समोर आलेली असतानाच जिल्ह्याचे प्रमुख नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण साखर कारखाना मात्र प्रचंड तोटा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला असल्याचे विदारक चित्रही पुढे आले आहे.
नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातल्या वरील दोन्ही संस्थांमध्ये दिग्गजांचा सहभाग आहे. भाऊराव चव्हाण कारखान्याला यंदाच्या गळीत हंगामात ऊस खरेदी आणि रास्त व किफायतशीर दर या आघाडीवर मोठी कसरत करावी लागली. हंगामाची धामधूम सुरू असतानाच कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तिडके यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे लवकरच या संस्थेला नवा अध्यक्ष लाभणार आहे.
नांदेड शेजारच्या लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ समूहातील साखर कारखाने नफ्यात चालवले जात असताना, उत्कृष्ट व्यवस्थापनाचा दावा सांगणारा ‘भाऊराव कारखाना’ मात्र प्रचंड तोट्यात असल्याचे सांगण्यात आले. मागील अनेक हंगामांमध्ये या कारखान्यात क्षमतेएवढे उत्पादन झाले, इथेनॉल निर्मितीही झाली; पण हा कारखाना तोट्यात का गेला, याचा नेमका खुलासा संचालक मंडळ किंवा व्यवस्थापनाने कधी केला नाही, असे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रा.संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी नमूद केले.
सुमारे दोन वर्षांपूर्वी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने सभासदांना भाग खरेदीसाठी जिल्हा बँकेकडे सुमारे १२ कोटींचा कर्ज प्रस्ताव दाखल केला होता; पण या कर्जास हमी देण्याचे कारखान्याने टाळले होते. या प्रस्तावाच्या निमित्ताने कारखान्याची बिकट अवस्था समोर आली. त्यानंतरही हा कारखाना तोट्यात असल्याचे सोमवारी संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्पष्ट झाले.
चव्हाणांच्या साखर कारखान्यावर तोट्याचे काळे ढग दाटले असताना, भास्करराव खतगावकर यांनी आपल्या दीड वर्षांच्या अध्यक्षपदाच्या राजवटीत जिल्हा बँकेला संचित तोट्याच्या काळ्या डागांतून मुक्त करण्याचा बहुमान २०२४-२५ या वर्षांत मिळविला. ही बँक संचित तोट्यातून मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष समाप्तीप्रसंगी या बँकेत आता निव्वळ नफ्याचे पर्व सुरू झाले आहे.
बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी दिवसभर अंतिम आकडेमोड सुरू होती. गेल्या दोन दशकांतील प्रचंड संचित तोटा भरून काढत, ही बँक नफ्यात आली आहे. अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १५ टक्क्यांच्या खाली आल्यामुळे बँकेची पत वाढली आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.