अनिकेत साठे
नाशिक : माजी नगरसेवकांपाठोपाठ नाशिकचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आणखी पडझड होऊ नये म्हणून धास्तावलेल्या ठाकरे गटाने प्रभागनिहाय संघटनात्मक बैठकांद्वारे निष्ठावान शिवसैनिकांना बळ देण्याचे निश्चित केले आहे. त्याची सुरूवात पक्षांतर करणाऱ्यांच्या प्रभागातून करण्यात येणार आहे.
दुसरीकडे शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनीही प्रशिक्षण वर्गाद्वारे कार्यकर्त्यांची मोट बांधून संभ्रम, शंकांचे निरसन करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये बराच काळ संघटनात्मक पातळीवर एकसंघ राहिलेला पक्ष आता पूर्णपणे विखुरला गेला आहे. प्रारंभी, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे हे लोकप्रतिनिधी वगळता शिंदे गटाच्या गळाला कुणी लागले नव्हते. त्यामुळे पक्ष जागेवरच असल्याचा दावा अनेकदा खा. संजय राऊत करू शकले. पण आठवडाभरात हे चित्र पालटले.
हेही वाचा: कोल्हापुरात महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचेही यश उल्लेखनीय
पडझड रोखणे त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले. नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागताच राऊतांनी त्यांची ट्विटरवरून हकालपट्टी केली. तत्पुर्वी ठाकरे गटाच्या १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. पुढील काळात आणखी काही नगरसेवक, पदाधिकारी दाखल होणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जाते. महानगरपालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. आता किती ठाकरे गटासोबत राहतील आणि किती शिंदे गटात जातील, याचा अंदाज घेतला जात आहे. फुटीमुळे ठाकरे गटात संशयकल्लोळ पसरला आहे. पक्षांतर करणाऱ्यांशी सख्य राखणाऱ्यांकडे संशयाने बघितले जाते. त्यामुळे पडझड रोखण्यासाठी चाललेल्या नियोजनातून त्यांना डावलले गेले. ही कार्यशैली अस्वस्थतेत भर घालत आहे.
ठाकरे गटाने २५ डिसेंबरपासून प्रभागनिहाय संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले आहे. दोन महिने चालणाऱ्या या कार्यक्रमातून उर्वरित नगरसेवक व शिवसैनिकांना पक्षाशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न आहे. फुटीर १२ नगरसेवकांच्या प्रभागातून या बैठकांची सुरूवात होईल. तिथे निष्ठावान शिवसैनिकांना पुढे आणण्याचे नियोजन असल्याचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुुधाकर बडगुजर यांनी सांगितले. बैठकांमधून संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. भाऊसाहेब चौधरींसारखा शिवसैनिक शिंदे गटास मिळाल्याने ठाकरे गट कुणावरही विश्वास ठेवायला तयार नाही.
हेही वाचा: सारथ्य समृद्धीवरचे आणि राजकारणाचे: शिदेंसाठी एक सुसह्य, दुसरे हादरे देणारे
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचा मार्ग अनुसरला आहे. कामटवाडे येथील माजी नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या प्रभागातून त्याचा श्रीगणेशा झाला. पुढील काळात सर्व नगरसेवकांच्या प्रभागात हा वर्ग होणार आहे. या माध्यमातून आपली भूमिका काय, पक्ष का सोडला, आपल्याला नेमके काय पाहिजे, या बाबी मांडल्या जात असल्याचे माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी नमूद केले. पक्षांतरामुळे नागरिकांच्या मनांत काही शंका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे निरसन कसे करावे, याचे पाठ वर्गातून दिले जात आहे. संघटनात्मक पातळीवर फाटाफूट झाल्यामुळे दोन्ही गटांनी कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी धडपड सुरू केली आहे.