पिंपरी : पक्षातील स्पर्धकांनी पक्षांतर केल्याने भोसरीतून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकमेव आमदार महेश लांडगे इच्छुक आहेत. उमेदवार कोण असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार लांडगे यांनाच पसंती दिली. त्यानंतर आमदार लांडगे यांना उमेदवारी देण्याचा ठरावही केला आणि निरीक्षकांना दिला.
भाजपकडून लांडगे हे एकमेव इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि भोसरीतही भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. पिंपरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) अण्णा बनसोडे आमदार आहेत. ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ’ असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार भाजपचे प्रवासी प्रभारी नेता प्रदीपसिंग जडेजा यांच्या उपस्थितीत चिंचवड आणि भोसरीतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
आणखी वाचा-Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं
चिंचवडमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक शीतल शिंदे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांना न बोलविता तीन इच्छुकांची नावे बंद लिफाफ्यात घेतली. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप आणि तिसऱ्या क्रमांकावर विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे यांची नावे दिली आहेत.
भोसरीतून केवळ आमदार महेश लांडगे यांचे एकट्याचेच नाव तिन्ही क्रमांकावर देण्यात आले. तसेच आमदार लांडगे हे एकटेच इच्छुक असून त्यांना उमेदवारी देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपला सुटण्याचे आणि आमदार लांडगे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
भोसरीतून २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला असून ते नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत. दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे रवि लांडगे यांनीही भाजप सोडला आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना पक्षांतर्गत स्पर्धकच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा-गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात फूट पडली आहे. निवडणूक लढविण्यासाठी माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी २० माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत भोसरीची जागा कोणाला सुटणार, हा कळीचा मुद्दा आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचा भोसरीवर दावा आहे. भाजपकडून आमदार लांडगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार. हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमदार लांडगेंची चिंता वाढली
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार लांडगे यांनी केला. परंतु, आढळरावांना भोसरीतून केवळ नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. मागीलवेळी ३७ हजारांचे मताधिक्य होते. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) तिन्हीपक्ष सोबत असतानाही मताधिक्य घटल्याने आमदार लांडगेंची चिंता वाढली आहे. भोसरीतील पदाधिकारी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात गेले आहेत. त्यामुळे आमदार लांडगे यांना निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे.