मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत, हे दाखविण्याचा प्रकार आहे. याच टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत झाले. मात्र, अद्याप एकही वीट रचलेली नाही. एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन करून भाजप महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केला.

हेही वाचा : काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान

टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मोदी हे खोटे बोलणारी मशीन असून महात्मा गांधी यांच्या तपोभूमीतूनही ते खोटे बोलले. महाराष्ट्राला प्रकल्प दिल्याचे भासविले जाते, पण दिल्लीतील गुजरात लॉबी महाराष्ट्र कमजोर करीत आहे. नागपूरमधील १८ हजार कोटी रुपयांचा सौर प्रकल्पही गुजरातला गेला आहे. पण तो प्रकल्प गुजरातला गेला नाही, असे फडणवीस खोटे सांगत आहेत. केंद्रातील गुजरात लॉबीच्या आदेशाने महाराष्ट्रातील उद्याोग व प्रकल्प गुजरातला पळविले जात असून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविली जात आहे. त्यास भाजप सरकार जबाबदार आहे.