छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. कथित मद्य घोटाळ्यासंदर्भात ईडीने सोमवारी एकूण १४ ठिकाणी छापे टाकले. छत्तीसगड सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात बघेल यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान तिजोरीमधील २,१६१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी तपासादरम्यान आढळलेले धागेदोरे चैतन्य यांच्याशी निगडीत असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
कोण आहेत चैतन्य?
भूपेश यांना चार मुलं आहेत. यापैकी चैतन्य हे काँग्रेसचे सदस्य आहेत, मात्र राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. चैतन्य यांनी त्यांचा शेती व्यवसाय सांभाळला आहे. याआधी ते बांधकाम व्यवसाय करत होते.
काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ ते २०२३ दरम्यान भूपेश बघेल राज्याचे नेतृत्व करत असतानाच चैतन्य यांचा राजकारणातला प्रवेश निश्चित झाला होता. बघेल यांना राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी या निवडणुकीत जर वडील भूपेश बघेल जिंकले तर चैतन्य यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार होती, तशी अटच घालण्यात आली होती. मात्र, भूपेश बघेल यांचा पराभव झाल्याने प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही.
ईडीच्या रडारवर असण्याची चैतन्य यांची ही पहिलीच वेळ नाही. भिलाई इथे कार्यरत प्राध्यापकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चैतन्य यांची चौकशी केली होती. केंद्रीय आणि राज्य संस्थांचा गैरवापर करून बदनामी करत राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्याचा आरोप करत चैतन्यने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं होतं.
काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानावर ईडीने छापे टाकल्यावर पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. “गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला जो न्यायालयानेही फेटाळला आहे, त्यासाठी आता ईडीचे पाहुणे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या घरात घुसले. जर कोणी कारस्थान करत पंजाबमध्ये काँग्रेसला अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा गैरसमज आहे”, असे माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एक्सवर पोस्ट करण्यात आले आहे.
“महत्त्वाच्या विषयांना बगल देत या विषयाला मोठं करत चर्चेत आणण्याचा हा भाजपाचा प्रयत्न आहे”, असं पवन खेरा यांनी म्हटलं आहे.
“बातम्यांचे मथळे बदलण्यासाठी, करवाढ, घसरणारी अर्थव्यवस्था, मतदार यादीतले घोटाळे अशा अनेक घडामोडींवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी बघेल यांच्या घरावर ईडीची कारवाई करण्यात आली”, असे पवन खेरा यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. २४ फेब्रुवारीपासून छत्तीसगड विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
ईडीच्या कारवाईचे पडसाद अधिवेशनातही उमटले. कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपावर तीव्र संताप व्यक्त केला.