Big Fights of Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकलाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की इंडिया आघाडीला यश मिळणार, नक्की कोणाचे सरकार स्थापन होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशातील या प्रमुख लढतींकडे लोकांचे लक्ष लागले आहे. देशातील प्रतिष्ठेच्या लढतींवर एक नजर टाकू या.

वाराणसी: नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली आहे. २०१४ मध्ये त्यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आणि २०१९ मध्ये समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांच्याविरोधात विजय मिळवला. काँग्रेसने २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघातून अजय राय यांना उमेदवारी दिली. नरेंद्र मोदींपूर्वी वाराणसीची जागा भाजपाचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांच्याकडे होती.

हेही वाचा : २०१९ प्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणूक मतमोजणीत ‘पोस्टल बॅलेट’ निर्णायक ठरणार का?

रायबरेली: राहुल गांधी विरुद्ध दिनेश प्रताप सिंह

राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून भाजपाचे दिनेश प्रताप सिंह यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे. ते अमेठीतून तीन वेळा खासदार राहिले आहेत. २०१९ मध्ये विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. फेब्रुवारीपर्यंत त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडे असलेली रायबरेली ही जागा १९५२ पासून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जाते. १९७७ (जनता पार्टी), १९९६ व १९९९ (भाजपा) या तीन निवडणुका वगळता या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. आता राहुल गांधी हा वारसा जिवंत ठेवू शकतील का, अशी अटकळ सुरू आहे.

वायनाड: राहुल गांधी विरुद्ध ॲनी राजा

वायनाडमध्ये सीपीआय नेत्या व महिला हक्क कार्यकर्त्या ॲनी राजा आणि राहुल गांधी यांच्यात प्रमुख लढत आहे. विशेषत: काँग्रेस आणि सीपीआय हे दोन्ही इंडिया आघाडीचे सदस्य असल्यामुळे या स्पर्धेत प्रचंड उत्सुकता आहे. २०१९ मध्ये गांधींनी वायनाड मतदारसंघातून सीपीआयच्या पीपी सुनीर यांचा ४.३१ लाख मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केल्यावर विजय मिळविला होता.

अमेठी: स्मृती इराणी विरुद्ध किशोरी लाल शर्मा

एकेकाळी गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या अमेठीमध्ये गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. आता स्मृती इराणी दुसर्‍यांदा निवडून येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने गांधी कुटुंबाचे जवळचे सहकारी किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेली नाही.

तिरुवनंतपुरम: शशी थरूर विरुद्ध राजीव चंद्रशेखर

विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर सलग चौथ्यांदा तिरुवनंतपुरममधून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांची लढत भाजपा नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी आहे. रिंगणात असलेले दुसरे प्रमुख नेते सीपीआयचे पन्नियन रवींद्रन आहेत. त्यांनी २००५ मध्ये तिरुवनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

बहरामपूर: अधीर रंजन चौधरी विरुद्ध युसूफ पठाण

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना तृणमूल काँग्रेस (टीएमसी)ने पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. सध्या काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पश्चिम बंगाल काँग्रेस युनिटचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी १९९९ मध्ये या जागेवरून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते पाच वेळा बहरामपूरचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते या मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येण्याच्या तयारीत आहेत.

नवी दिल्ली : बन्सुरी स्वराज विरुद्ध सोमनाथ भारती

भाजपाने या मतदारसंघातून दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना रिंगणात उतरवले आहे. आम आदमी पक्षाने (आप) मालवीय नगरचे आमदार सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रीय राजधानीत काँग्रेस आणि आप यांनी लोकसभा निवडणूक युतीत लढविल्यामुळे हाय-प्रोफाइल मतदारसंघातील या लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजनांदगाव : भूपेश बघेल विरुद्ध संतोष पांडे

तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगडमधील राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आपले माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांची भाजपाचे विद्यमान खासदार संतोष पांडे यांच्याशी लढत आहे. २००९ पासून ही जागा भाजपाने जिंकली आहे. काँग्रेसने आपला तगडा उमेदवार उभा केल्याने यंदा पक्षाला या मतदारसंघातून निवडून येण्याची आशा आहे.

चुरू: राहुल कासवान विरुद्ध देवेंद्र झाझारिया

चुरूचे दोन वेळा खासदार राहिलेले राहुल कासवान यांनी निवडणुकीपूर्वी भाजपाचा राजीनामा दिला आणि त्याच जागेवरून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यांची लढत पॅरालिम्पिक चॅम्पियन भाजपा उमेदवार देवेंद्र झाझरिया यांच्याशी आहे. पद्मभूषण भालाफेकपटू झाझरिया यांना दोन वेळा पॅरालिम्पिक सुवर्णपदक आणि एक वेळा रौप्यपदक मिळाले आहे.

हेही वाचा : निकालाच्या एक दिवस आधी नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींची भेट का घेतली?

शिवमोग्गा: के एस ईश्वरप्पा विरुद्ध राघवेंद्र

कर्नाटकातील शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपाने ज्येष्ठ नेते व ओबीसी चेहरा के. एस. ईश्वरप्पा यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.