Pashupati Kumar Paras RJD : लोकसभेपाठोपाठ तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजपाने आपला राजकीय दरारा कायम ठेवला. आता पक्षाचे पुढील लक्ष्य यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या बिहारच्या निवडणुकीवर आहे. महाराष्ट्र, हरियाणा व दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन, एनडीएनं बिहारमध्ये २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे. मात्र, त्याआधीच राज्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा जुन्या मित्रपक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
पशुपती पारस यांनी भाजपाची साथ का सोडली?
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (RLJP) प्रमुख पशुपती पारस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (NDA) असलेले सर्व संबंध तोडले आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बिहारमधून एकही तिकीट न मिळाल्यामुळे आमच्या पक्षाचा अपमान झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतर पशुपती पारस हे राष्ट्रीय जनता दल (RJD) नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दलातील एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाआघाडीकडून राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला काही जागा सोडल्या जाऊ शकतात. पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आतापर्यंत बिहारच्या एकाही निवडणुकीत भाग घेतलेला नाही, मात्र तरीही ते चिराग पासवान यांच्या मतदारांवर परिणाम करतील, अशी आम्हाला आशा आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाचा पासवान समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी निवडणुकीत वेळोवेळी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे,” असे आरजेडीच्या एका नेत्याने सांगितले.
आणखी वाचा : Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात कुणाचा हस्तक्षेप?
पारस यांच्या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा संभाव्य राजकीय फेरबदल अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण बिहारमध्ये अनुसूचित जाती (SC) समुदायातील मतदारांची एकूण संख्या १९.६५ टक्के इतकी आहे. त्यामध्ये पासवान समुदायातील ५.३ टक्के मतदार आहेत. पशुपती पारस यांना महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे पक्ष उत्सुक आहेत. कारण – राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीतील मतांचा फरक कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी आघाडीने २४३ पैकी ११० जागा जिंकल्या होत्या, ते केवळ १२ जागांनी बहुमतापासून दूर राहिले होते.
पासवान समुदायाचा सर्वाधिक पाठिंबा कुणाला?
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी २००० साली लोक जनशक्ती पक्षाची (LJP) स्थापना केली. त्यांनी पासवान समाजाचे एकमेव नेते म्हणून आपले स्थान निर्माण केले. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत २९ जागा जिंकून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना चकित करून सोडलं. त्यावेळी लोक जनशक्ती पक्षाला निवडणुकीत १२ टक्के मतं मिळाली होती. पशुपती पारस हे रामविलास पासवान यांचे बंधू व हाजीपूरचे माजी खासदार आहेत. त्यांनी २०२१ मध्ये लोक जनशक्ती पक्षातून बंड करून राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व चिराग पासवान करत आहेत, ज्यांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पशुपती पारस यांनी एनडीएवर काय आरोप केले?
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमच्या पक्षाला खूप अपमान सहन करावा लागला. आता त्यांना सोडण्याची वेळ आली असून नवीन राजकीय मार्ग निवडण्याची गरज आहे. आम्हाला आदर देणाऱ्या कुठल्याही आघाडीसोबत आम्ही जाण्यास तयार आहोत,” असे पशुपती पारस यांनी सोमवारी पक्षाच्या एका बैठकीत सांगितले. रामविलास पासवान यांचे बंधू रामचंद्र पासवान यांचे पुत्र आणि माजी समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज यांनीही एनडीएवर टीका केली आहे. राज्यभरात दारूबंदी कायद्याच्या प्रकरणांमध्ये पाच लाखांहून अधिक दलित तुरुंगात खितपत पडले आहेत. एनडीएला दलितांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपाकडून चिराग पासवान यांच्यावर विश्वास
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असूनही भाजपाने पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा सोडली नाही. त्यांच्याऐवजी एनडीएने चिराग पासवान यांच्या पक्षावर पूर्ण विश्वास दाखवला, ज्यांनी लोकसभेच्या पाचही जागा जिंकून १०० टक्के विजय मिळवला. चिराग यांनी हाजीपूर मतदारसंघही जिंकला, जो त्यांच्या वडिलांनी आठ वेळा जिंकला होता. लोक जनशक्ती पक्षाच्या (पासवान) कामगिरीने चिराग यांना त्यांच्या वडिलांचा खरा राजकीय वारसदार म्हणून सिद्ध केले. या विजयामुळे बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत त्यांचे स्थान आणखीच बळकट झाले.
एका भाजपा नेत्याने सांगितले, “पशुपती पारस यांचा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय म्हणजे त्यांची एक प्रकारची सुटकाच आहे. आता त्यांना महाआघाडीत सामील होऊन राजकीय उपयुक्तता सिद्ध करू द्या. पशुपती पासवान यांचे पाय जमिनीवर नाही. चिराग हेच पासवान समाजाचे एकमेव खरे नेते आहेत आणि रामविलास पासवान यांची खरी राजकीय परंपरा पुढे नेणारे आहेत.”
हेही वाचा : Congress Strategy : काँग्रेससमोर कोणकोणती आव्हानं? गुजरातमध्ये भाजपाला कसं रोखणार?
मुख्यमंत्रिपदावरून एनडीएमध्ये फूट?
बिहार विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पद भाजपाच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात खूपत असल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेत्यांनी अगदी उघडपणे मुख्यमंत्रिपदावरून विधाने करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं होतं. नितीश कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद आता काही मोठं राहिलं नाही, असं ते म्हणाले होते.
‘नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवणार’
आता हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. भाजपा नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘विजयाचा ध्वज’ फडकावतील, असं सैनी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानानंतर जनता दल युनायटेडचे नेते आक्रमक झाले असून भाजपानं या विधानावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी ते करीत आहेत. त्यावर भाजपाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. “आम्ही याआधी अनेक वेळा म्हटलंय की, आगामी विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल, याबाबत कोणताही संभ्रम नाही,” असे बिहारमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी म्हटलं आहे.