अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी नव्हे, इतकी अनपेक्षित घडामोडींनी गाजली. सलग २५ वर्षे बँकेवर एकहाती वर्चस्व ठेवून असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच हादरा बसला. केवळ सहा संचालक सोबत असतानादेखील राज्यातील सत्तारूढ आघाडीतील आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसमध्ये खिंडार पाडून अध्यक्षपद मिळवले. गाफील राहिलेल्या काँग्रेसजनांसाठी हा एक धडाच मानला जात आहे.
अमरावती जिल्हा बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणूक झाली. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या थेट सहभागाने ही निवडणूक राज्यभरात लक्षवेधी ठरली होती. तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार गटाने १३ जागा जिंकून आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. परिवर्तन गटाचे संघटक बच्चू कडू हे निवडून आले, पण त्यांच्या पॅनेलमधील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, भाजपाचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा समावेश होता. परिवर्तन गटाला सहा जागांवर समाधान मानावे लागले होते. दोन अपक्ष संचालक यावेळी निवडून आले होते.
हेही वाचा – हसन मुश्रीफ – सतेज पाटील यांच्या वाटा वेगळ्या झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणावर परिणाम
बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा सहभाग असलेल्या सहकार गटाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. आमदार यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे सहकार गटाची धुरा होती. बहुमत असल्याने २०२१ मध्ये अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छूक होते. नावांवर मतैक्य होत नव्हते, अखेरीस सहकार गटाचे सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्षपदी सुरेश साबळे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होऊन ते निवडूनही आले. पण, ही पदे दीड वर्षांनंतर सहकार गटातील इतर संचालकांना मिळावीत, असा मध्यममार्ग काढण्यात आला.
दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. आता यावेळी देखील सहकार गटाकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नावे निश्चित करणे फारसे कठीण जाणार नाही, असे सांगितले जात होते. सहकार गटात नावांवर खल सुरू असताना दुसरीकडे, आमदार बच्चू कडू यांचा परिवर्तन गट संचालकपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत होता. ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत अविरोध होऊ द्यायची नाही, असे या गटाने ठरवले. सहकार गटातर्फे अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि उपाध्यक्षपदासाठी हरीभाऊ मोहोड यांची नावे निश्चित झाल्यानंतर परिवर्तन गटाने थेट बच्चू कडू यांना रिंगणात उतरविण्याचे ठरवले. अध्यक्षपदासाठी बच्चू कडू तर उपाध्यक्षपदासाठी अभिजीत ढेपे यांनी उमेदवारी अर्ज भरला. परिवर्तन गटाचे ६ संचालक आणि २ अपक्ष जरी त्यांच्याकडे गेले, तरी ही निवडणूक परिवर्तन गटाला जिंकता येणार नाही, अशी काँग्रेसच्या नेत्यांची समजूत होती. पण, काँग्रेसमधील अंतर्विरोध, गटांचे राजकारण याचा फायदा उठवत सहकार गटातील तीन संचालक आपल्याकडे खेचण्यात बच्चू कडू यशस्वी ठरले. काँग्रेसचे नेते गाफील राहिले आणि अवघ्या एका मताने वीरेंद्र जगताप, हरीभाऊ मोहोड यांचा पराभव झाला.
हेही वाचा – लोकसभेतील ४४ टक्के आणि राज्यसभेतील ३१ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटले प्रलंबित
दीड वर्षांनंतर सहकार गटातील अन्य संचालकाकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा काँग्रेसमधील अंतर्गत करार हाच सहकार गटासाठी गोतास काळ ठरला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना सहकार गटाची अवस्था ‘तेलही गेले…’ अशी झाली. सहकार गटातील संचालकाच्या हाती धुरा येण्याऐवजी राज्यातील सत्ताधीशांनी बँकेत सत्तांतरच घडवून आणले. बच्चू कडू यांच्या या कामगिरीचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर कशा पद्धतीने होणार, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.