२०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलने भाजपाच्या महत्त्वाकांक्षी ‘४०० पार’च्या घोषणेला बळ दिले होते. परंतु, भाजपाप्रणीत एनडीएला २९२ पर्यंतच मजल मारता आली. दुसरीकडे काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने अनपेक्षित टप्पा गाठला. इंडिया आघाडीने सर्व एक्झिट पोलनी व्यक्त केलेले अंदाज सपशेल फोल ठरवीत २३२ जागा जिंकल्या. या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. भाजपातील अनेक मोठी नावे या निवडणुकीत चितपट झाली; तर काँग्रेस पक्षातीलही नावांमागे मोठे वलय असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यात भाजपाच्या स्मृती इराणींपासून ते काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्यापर्यंत अजिंक्य मानल्या जाणार्‍या अनेक नेत्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या या दिग्गजांच्या पराभवावर एक नजर टाकू या.

भारतीय जनता पक्ष

स्मृती इराणी : २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव करीत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी भाजपामधील एक प्रमुख चेहरा ठरल्या. मात्र, या लोकसभा निवडणुकीत इराणी यांचा १.६७ लाख मतांच्या फरकाने गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जाणारे किशोरी लाल शर्मा यांच्याकडून पराभव झाला. शर्मा यांना ५,३९,२२८ मते मिळाली, तर इराणी यांना ३,७२,०३२ मते मिळाली. या विजयासह काँग्रेसने अनेक दशकांपासून गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीची जागा परत मिळवली.

हेही वाचा : देशात सर्वाधिक काळ पदावर असणारे पंतप्रधान कोणते?

राजीव चंद्रशेखर : केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर यांनी १६,०७७ मतांच्या फरकाने पराभव केला. मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला चंद्रशेखर या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु, थरूर यांना अखेरीस ३,४२,०७८ मते मिळाली आणि ते विजयी ठरले. पराभव स्वीकारताना चंद्रशेखर म्हणाले, “आमच्या मतांतील अंतर फार नव्हते. केरळमधील जनता भाजपला मोठ्या प्रमाणावर साथ देत असल्याचे यावरून दिसून येते. आज मी जिंकू शकलो नाही; परंतु केरळमध्ये भाजपाची वाढ अपेक्षित आहे आणि ती कायम राहील.”

अजय मिश्रा टेनी : उत्तर प्रदेशच्या खेरी लोकसभा मतदारसंघात तीनदा खासदार राहिलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा समाजवादी पक्षाच्या उत्कर्ष वर्मा यांनी ३४,३२९ मतांनी पराभव केला. शेती कायद्याच्या निषेधादरम्यान लखीमपूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर टेनी चर्चेत आले. प्रचंड विरोध होऊनही या भाजपा नेत्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.

अर्जुन मुंडा : झारखंडच्या खुंटी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री आणि विद्यमान खासदार अर्जुन मुंडा यांचा काँग्रेसच्या काली चरण मुंडा यांच्याकडून १.४ लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपा नेत्याला ३,६१,९७२ मते मिळाली; तर काँग्रेस उमेदवाराला ५,११,६४७ मते मिळाली.

मनेका गांधी : आठ वेळा खासदार राहिलेल्या भाजपा नेत्या मनेका गांधी यांना उत्तर प्रदेशातील सुलतानपूरची जागा राखता आली नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गांधी यांचा समाजवादी पक्षाचे नेते रामभुआल निषाद यांच्याकडून ४३ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुलतानपूरमध्ये विविध पक्षांचे खासदार आले आहेत. कोणत्याही एका पक्षाने पूर्ण वर्चस्व राखलेले नाही. या मतदारसंघात काँग्रेसने आठ वेळा, बसपाने दोनदा, तर भाजपाने चार वेळा विजय मिळविला आहे.

के. अन्नामलाई : आयपीएस अधिकारी के. अन्नामलाई यांना भाजपाने तमिळनाडूच्या कोईम्बतूर जागेवरून उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाला दक्षिणेकडील राज्यात निवडणूक जिंकण्याची आशा होती. परंतु, या निवडणुकीत पदार्पण करणारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष द्रमुकचे उमेदवार गणपती राजकुमार पी. यांनी त्यांचा पराभव केला. एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभूत झाल्यानंतर अन्नामलाई म्हणाले, “मी कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातील लोकांसमोर नतमस्तक आहे. एनडीए आणि भाजपावर विश्वास दाखविणाऱ्या ४.५ लाख मतदारांचे मी आभार मानतो. मी लोकांना आश्वासन देतो. भविष्यात तुमचे प्रेम आणि जनादेश मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट प्रयत्न करू.”

आर. के. सिंह : भाजपाने ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांना बिहारच्या अराहमधून उमेदवारी दिली होती. परंतु, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सुदामा प्रसाद यांनी सिंह यांना ५९,८०८ मतांनी पराभूत केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आर. के. सिंह यांनी मतदानाच्या ५२.४२ टक्के मते मिळवून सीपीआय (एमएल) (एल)च्या राजू यादव यांच्याविरोधात विजय मिळवला होता.

तमिलिसाई सुंदरराजन : तमिळनाडूच्या चेन्नई दक्षिण-३ जागेवर भाजपाने रिंगणात उतरवलेल्या तमिलिसाई सुंदरराजन यांना डीएमकेचे उमेदवार टी सुमथी ऊर्फ ​​थमिझाची थंगापांडियन यांनी २,२५,९४५ मतांच्या फरकाने पराभूत केले. तमिळनाडूच्या माजी भाजपा प्रमुख तमिलिसाई सुंदरराजन यांना २,९०,६८३ मते मिळाली; तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ५,१६,६२८ मते मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात परतण्यासाठी सुंदरराजन यांनी तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.

दिलीप घोष : पश्चिम बंगालच्या वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून पश्चिम बंगाल भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांचा तृणमूल काँग्रेसचे क्रिकेटपटू-उमेदवार कीर्ती आझाद यांनी पराभव केला. घोष यांना ५,८२,६८६ मते मिळाली. परंतु, कीर्ती आझाद यांच्याकडून त्यांचा १,३७,९८१ मतांच्या फरकाने पराभव झाला.

एस. एस. अहलुवालिया : पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये भाजपाचे उमेदवार सुरेंद्रजित सिंह अहलुवालिया यांचा ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी व टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पराभव केला. अहलुवालिया यांचा सिन्हा यांनी ५९,५६४ मतांनी पराभव झाला. अहलुवालिया यांना ५,४६,०८१ (४१.९६ टक्के) मते मिळाली; तर सिन्हा यांना ६,०५,६४५ (४६.५३ टक्के) मते मिळाली.

काँग्रेस

आनंद शर्मा : हिमाचल प्रदेशातील कांगडा जागा मिळविण्याच्या शर्यतीत काँग्रेसचे उमेदवार आनंद शर्मा भाजपाच्या राजीव भारद्वाज यांच्याकडून २,५१,८९५ मतांनी पराभूत झाले. शर्मा यांना ३,८०,८९८ मते मिळाली; तर विजयी उमेदवार भारद्वाज यांना ६,३२,७९३ मते मिळाली.

कन्हैया कुमार : काँग्रेस नेते आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष, कन्हैया कुमार ईशान्य दिल्ली मतदारसंघातून उभे होते. त्यांचा भाजपाच्या मनोज तिवारी यांनी १,३८,७७८ मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कन्हैया कुमार यांना एकूण ६,८५,६७३ मते मिळाली; तर तिवारी यांना ८,२४,४५१ मते मिळाली.

राज बब्बर : अभिनेता-राजकारणी राज बब्बर हरियाणाच्या गुरुग्राम मतदारसंघातून उभे होते. त्यांचा भाजपाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांच्याकडून ७५,०७९ मतांनी पराभव झाला. राजा राव तुला राम यांचे वंशज असलेल्या सिंह यांना ८,०८,३३६ मते मिळाली, तर बब्बर यांना ७,३३,२५७ मते मिळाली.

विक्रमादित्य सिंह : हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आणि अभिनेत्री-राजकारणी व भाजपा उमेदवार कंगना राणौत आमने-सामने होते. सिंह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. या निवडणुकीत पदार्पण करणाऱ्या कंगना राणौत यांच्याकडून सिंह यांचा ७४,७५५ मतांनी पराभव झाला.

नकुल नाथ : माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र व छिंदवाडा खासदार राहिलेले काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ यांचा भाजपाच्या विवेक साहू यांच्याकडून एक लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला. नकुल यांना त्यांच्या कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात ५,३१,१२० मते मिळाली; तर साहू यांना ६,४४,७३८ मते मिळाली.

दिग्विजय सिंह : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये १,४६,०८९ मतांच्या फरकाने पराभूत झाले. ते भाजपा नेते रोडमल नगर यांच्याविरोधात उभे होते. सिंह यांना ६,१२,६५४ मते; तर नगर यांना ७,५८,७४३ मते मिळाली.

इतर नेते

ओमर अब्दुल्ला : नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शेख अब्दुल राशीद यांच्याकडून पराभव स्वीकारला. अब्दुल्ला यांचा रशीद यांच्याकडून २,०४,१४२ मतांनी पराभव झाला. त्यांनी निकालाची आकडेवारी समोर येताच सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, पराभव स्वीकारण्याची वेळ आली आहे.

मेहबूबा मुफ्ती : पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या मियां अल्ताफ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. माजी मुख्यमंत्री २,३६,७३० मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या. “लोकांच्या मतांचा आदर करून, मी माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्थनाबद्दल आभार मानतो. ज्या लोकांनी मला मतदान केले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. मियांसाहेबांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन,” असे मुफ्ती यांनी ‘एक्स’वर लिहिले.

हेही वाचा : तिहार तुरुंगातून ओमर अब्दुल्लांचा पराभव करणारे राशिद शेख कोण आहेत?

प्रज्वल रेवण्णा : लैंगिक शोषणाच्या अनेक आरोपांप्रकरणी अटक केलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि संयुक्त भाजपा-जेडी(एस) उमेदवार प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या श्रेयस गौडा रेड्डी यांच्याकडून पराभूत झाले. काँग्रेसच्या ६,७२,९८८ च्या तुलनेत रेवण्णा यांना ६,३०,३३९ मते मिळाली. त्यांचा ४२,६४९ मतांच्या फरकाने पराभव झाला.

मोहम्मद बद्रुद्दीन अजमल : ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख मोहम्मद बद्रुद्दीन अजमल यांचा आसामच्या धुबरी मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदा पराभव झाला. अजमल यांचा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व काँग्रेस नेते रकीलबुल हुसेन यांनी १०,१२,४७६ पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.