बिहार सरकारने नवीन हेलिकॉप्टर आणि विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयाला बिहार मंत्रिमंडळाने मंगळावारी मंजुरी दिली. यावरून बिहारमधील विरोधी पक्षाने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नितीश कुमारांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात फिरण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
यासंदर्भात बिहारच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एक प्रस्ताव मंजूर केला होता. ज्याला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याचे मुख्यसचिव एस सिद्धार्थ यांनी सांगितलं की, “विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत तीन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचं काम एका समितीला देण्यात आलं आहे. राज्य सरकारकडे सध्या ६ आसनी विमान आहे. तर, डॉल्फिन मेक हेलिकॉप्टर आहे. या दोन्हींची दुरुस्ती सुरु आहे,” असं एस सिद्धार्थ यांनी म्हटलं.
हेही वाचा : “२०२४ ला भाजपाचा पराभव करायचा असेल तर…”, काँग्रेस नेते ए.के. अँटनी यांचं मोठं विधान
यावरून भाजपाने बिहार सरकारवर टीका केली आहे. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांना देशात फिरण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. छपरा हूच येथील दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारने कोणतीही मदत दिली नाही. पण, विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे,” असं भाजपा नेते अरविंद कुमार सिंग यांनी म्हणाले.