बिहारमध्ये राजद, जदयू, डावे पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष महायुती अंतर्गत एकत्र आहेत. या सर्व पक्षांनी युती करत बिहारमध्ये सरकार स्थापलेले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जात होते. असे असतानाच आता मंत्रिमंडळ विस्तारास मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून विलंब केला जात असल्यामुळे काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आणखी दोन मंत्रिपदं मिळावीत अशी काँग्रेसची मागणी आहे.
दोन मंत्र्यांनी दिला होता राजीनामा
राजदच्या सुधाकर सिंह आणि कार्तिक कुमार या दोन नेत्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बाराज समितीच्या धोरणावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे सिंह यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे कार्तिक कुमार यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ही दोन मंत्रिपदं रिक्त आहेत. ही दोन्ही मंत्रिपदं आम्हाला मिळावीत अशी काँग्रेसची मागणी आहे. सध्या बिहारच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडे दोन मंत्रिपदं आहेत. काँग्रेसचे बिहारमध्ये १९ आमदार आहेत.
काँग्रेसला दोन मंत्रिपदं देण्यात नितीश कुमार अनुकूल
२३ जून रोजी पाटणा येथे विरोधकांची बैठक पार पडली होती. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली होती. याच बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्यात या दोन मंत्रिपदांवर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनीदेखील ही मंत्रिपदं काँग्रेसला देण्यास तयारी दर्शवली होती. मात्र अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही.
दोन मंत्रिपदासाठी तीन नेत्यांची नावे
याच कारणामुळे काँग्रेसने राजद पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. “दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर लवकरच या दोन मंत्रिपदांवर निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. आम्हाला मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व नाही. आम्ही या दोन मंत्रिपदांसाठी तीन नेत्यांची नावे दिली आहेत,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्याने दिली.
काँग्रेस आणि जदयू पक्षातील सूत्रांनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार या दोन मंत्रिपदांसाठी ओबीसी समाजातून येणारे बिजेंद्र चौधरी, राजपूत समाजातून येणारे आनंद शंकर तसेच ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे विजय शंकर दुबे या तीन नावांचा विचार करत आहेत.
जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न
दरम्यान, जातीय समीकरण साधण्यासाठी राजद पक्षाने मंत्रिपदासाठी नेत्यांच्या नावांची घोषणा करण्याचे लांबवले आहे. “उच्च जातीतील नेत्यांऐवजी ओबीसी समाजातून येणाऱ्या नेत्याला या दोन मंत्रिपदांसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यासह मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान काही विद्यमान मंत्र्यांनादेखील वगळले जाऊ शकते. अशा प्रकारचे निर्णय विचार करूनच घ्यावे लागतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारास उशीर होत आहे,” असे राजदच्या एका नेत्याने सांगितले.
सध्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ३० मंत्री आहेत. मंत्रिमंडळात आणखी पाच जणांना स्थान देता येऊ शकते.