संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी भाजप तर कधी लालूप्रसाद यादव यांच्याशी युती करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एकेकाळी गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेला बिहार सरकारच्या नव्या निर्णयामुळे तडा गेला आहे. बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. कृष्णन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे माजी खासदार आनंद मोहन यांच्या सुटकेसाठी बिहार सरकारने तुरुंग नियमात बदल करून वादग्रस्त नेते अशी प्रतिमा असलेल्या आनंद मोहन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.

आनंद मोहन यांना २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. बिहार सरकारच्या तुरुंग नियमानुसार, सेवेत असलेल्या सनदी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगल्यावर शिक्षेत सूट देण्याची तरतूद होती. परंतु नितीशकुमार सरकारने नियमात बदल करून सेवेत असलेल्या सनदी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी १४ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगल्यास शिक्षेत सूट देण्याची दुरुस्ती केली. परिणामी आनंद मोहन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. आनंद मोहन यांचा मुलगा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा आमदार आहे. आनंद मोहन हे रजपूत समाजाचे नेते आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार-लालू यांच्या आघाडीला रजपूत मतांची आवश्यकता आहे. यातूनच आनंद मोहन यांच्या सुटकेसाठी नियमात बदल करण्यात आला.

हेही वाचा >>> सांगली भाजपमध्ये खासदारांच्या विरोधात नाराजीचा सूर

बिहारमध्ये लालूप्रसाद व त्यांची पत्नी राबडीदेवी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्थेचा पार चुथडा झाला होता. राजधानी पाटणा शहरात दिवसाढवळ्या लुटले जात असे. एका डॉक्टरला बंदुकीचा धाक दाखवून त्याची गाडी पळविण्यात आली होती. त्याची देशभर तेव्हा चर्चा झाली होती. सत्ताबदल होऊन नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी झाल्यावर त्यांनी प्रथम कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर भर दिला. यादव यांच्या कार्यकाळात गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही महिन्यांतच बिहारमधील कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती सुधारली.

हेही वाचा >>> Maharashtra News Live Today : रजेवर असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, बारसू प्रकल्पाला विरोध आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

गुन्हेगारांवर वचक बसविण्याची कामगिरी केल्यानेच नितीशकुमार यांना राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळाला. २००५ पासून काही काळ वगळता नितीशकुमार हे सातत्याने मुख्यमंत्रीपदी आहेत. राजकीय पातळीवर नितीशकुमार यांच्या विश्वासहर्तेबद्दल प्रशन्चिन्ह उपस्थित केले जाते. कधी भाजप तर कधी राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी करून नितीशकुमार मुख्यमंत्रीपदावर चिकटून आहेत. आता गुन्हेगांराना मोकळीक देण्याकरिता नियमात बदल केल्याने नितीशकुमार यांच्या गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून निर्माण झालेल्या प्रतिमेला तडा गेला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar chief minister nitish kumar government criminals politics print politics news ysh
Show comments