लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी ‘एनडीए’तील घटक पक्षांशी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या मागे भाजप लागला असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार मात्र ब्रिटनला निघून गेले आहेत. निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये नितीशकुमार इंग्लंड आणि स्कॉटलंडची ‘सहल’ करणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनला जाण्यापूर्वी नितीशकुमार दिल्लीत आले होते, त्यांना रात्री नऊनंतर विमानाने लंडनला रवाना व्हायचे होते. त्याआधी भाजपच्या नेत्यांशी प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून बिहारमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब करायचे होते. पण, इतक्या कमी अवधीमध्ये कुठल्याही गोष्टीचा निपटारा करणे हा शहांचा स्वभाव नसल्याने चर्चा पूर्ण झाली नाही. त्याच दिवशी महाराष्ट्रातील प्रदेश भाजपचे नेतेही शहांसाठी ताटकळत बसल होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी वेळ होता म्हणून आपापसांमध्येच कोअर ग्रूपची बैठक घेतली. त्या बैठकीला फारसा अर्थ नव्हताच मग, ही मंडळी रात्री उशिरा भाजपच्या मुख्यालयात शहा व नड्डांना भेटायला गेली. त्यामुळे बिहारची बोलणी मागे पडली. नितीशकुमार १२ मार्च रोजी मायदेशात परत आल्यानंतर भाजपला बिहारचा तिढा सोडवावा लागेल.

हेही वाचा : निवडणुकांचे पडघम वाजू लागले की गॅस सिलिंडर स्वस्त! दर कमी करण्यामागचे राजकीय गणित काय?

नितीशकुमार यांचा ब्रिटनचा दौरा अधिकृत म्हणजेच सरकारी असल्याचे सांगितले जात असले तरी, ते वैद्यकीय उपचारासाठी परदेशात गेल्याचे समजते. नितीशकुमार यांना स्मृतिभ्रंश झाल्याची चर्चा दिल्लीत रंगली होती. अचानक संतप्त होणे, गोष्टी विसरणे आदी स्मृतिभ्रंशाची लक्षणे असतात. नितीशकुमार जागावाटपाची बोलणी सुरू असताना ब्रिटनला निघून गेल्यामुळे तर्कवितर्क वाढू लागले आहेत. नितीशकुमार इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये स्थायिक झालेल्या बिहारी लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पाटणामध्ये डॉ. अब्दुल कलाम सायन्स सिटी प्रकल्प उभा केला जात आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने ब्रिटनमधील ‘सायन्स सिटीं’नाही नितीशकुमार भेटी देणार आहेत. लोकसभा निवडणूक महिन्याभरात होणार असताना, इतर राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असताना नितीशकुमार यांनी विज्ञान प्रकल्पाला प्राधान्य देण्यामागील रहस्य काय, हे कोणालाही कळलेले नाही. पण, नितीशकुमार परत येईपर्यंत भाजपच्या नेत्यांना हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

हेही वाचा : Lok Sabha Election : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा शिवसेना खासदाराला राजकीय फायदा किती ?

भाजपेतर महागठबंधनमधून नितीशकुमार यांना नाइलाजाने ‘एनडीए’मध्ये जावे लागले असल्याचेही बोलले जात आहे. नितीशकुमार ‘एनडीए’मध्ये जाण्याआधी नितीशकुमार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांना पदावरून काढून टाकावे लागले होते. ललन सिंह व लालूप्रसाद यादव यांचे सख्य असल्याचे सांगितले जाते. महागठबंधनमध्ये असतानाही नितीशकुमार यांचा जनता दल फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय नितीशकुमार यांना होता. राष्ट्रीय जनता दल किंवा भाजप दोन्हीपैकी कोणीही जनता दलाला भगदाड पाडू शकते या भीतीने नितीशकुमार यांनी ‘एनडीए’मध्ये जाणे पसंत केल्याचे बोलले जाते. या राजकीय अस्थिरतेमुळे नितीशकुमारांना पक्षावरील पकड सैल होऊ न देण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेतही नितीशकुमार यांचा अपेक्षित सहभाग नसल्याचे त्यांच्या ब्रिटनवारीतून दिसू लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar cm nitish kumar london visit ahead of lok sabha elections 2024 seat allocation print politics news css
Show comments