बिहारमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयू या पक्षातील नेते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. येथील महायुतीचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. नितीश कुमार पक्षांर्गत असलेली नाराजी, निस्तरण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच येथे मंत्री आणि नोकरशाही यांच्यातील वाद समोर आला आहे. हा वाद सोडवण्यासाठी खुद्द नितीश कुमार आणि राजद पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना हस्तक्षेप करावा लागत आहे.

चंद्रशेखर यांनी घेतली नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांची भेट

मिळालेल्या माहितीनुसार बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर आणि शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव के. के. पाठक यांच्यात वाद सुरू आहे. मला विश्वासात न घेताच पाठक वेगवेगळे निर्णय घेतात, अशी चंद्रशेखर यांची तक्रार आहे. हा वाद सोडवण्यासाठी चंद्रशेखर यांनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे. चंद्रशेखर हे राजद पक्षाचे नेते आहेत. तर के. के. पाठक हे जदयू पक्षाचे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. याच कारणामुळे या वादाला धार मिळाली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
NCP Sharad Chandra Pawar party has been consistently claiming that it has suffered losses due to the confusion between the Tutari and Pipani symbols in the Lok Sabha elections.
Supriya Sule: “भाजपाकडून रडीचा डाव, अजित पवारांनीही दिली कबुली”, तुतारी-पिपाणीवरुन सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
sharad pawar replied to devendra fadnavis
“…तर देवेंद्र फडणवीसांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे”, ‘त्या’ गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा टोला!
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश

चंद्रशेखर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची हकालपट्टी होणार?

चंद्रशेखर यांचे खासगी स्वीय सहाय्यक कृष्णानंद यादव यांच्याशीदेखील के. के. पाठक यांचे वाद आहेत. चंद्रशेखर यांची नाराजी कळवण्यासाठी यादव यांनी पाठक तसेच अन्य शासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मात्र या पत्रालाही शासकीय अधिकाऱ्यांनी तशाच भाषेत उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे यादव यांना मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. तसेच त्यांची स्वीय सहाय्यक पदावरून हकालपट्टी करण्याची प्रक्रियादेखील पाठक यांनी सुरू केली आहे. याच कारणामुळे चंद्रशेखर आणि पाठक यांच्यातील वाद वाढला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून बिहारच्या शिक्षण मंत्रालयात कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट परिधान करून येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासह अनेक आक्षेपार्ह निर्णय घेण्यात आले आहेत. परिणामी माध्यमांत या विभागाबाबत सातत्याने नकारात्मक वृत्त प्रसिद्ध होत आहेत. मंत्री चंद्रशेखर हे कार्यालयातील अधिकाऱ्यांची बदली करण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र यालादेखील पाठक यांनी विरोध केला आहे. याच कारणामुळे मंत्री चंद्रशेखर हे अतिरिक्त मुख्य सचिव के. के. पाठक यांच्यावर नाराज आहेत.

वाद मिटवण्याची चंद्रशेखर यांची मागणी

नोकरशाहीशी वाद वाढत चालल्यामुळे चंद्रशेखर यांनी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे. हा वाद मिटवून टाकण्याची त्यांनी या नेत्यांकडे मागणी केली आहे. माध्यमांना याबाबत विचाले असता, आमच्यात कोणताही वाद नाही, असे चंद्रशेखर यांनी सांगितले आहे. तसेच संविधानाच्या दृष्टीने शासकीय नोकर मोठा की मंत्री मोठा? हे सर्वांनाच माहिती आहे, असेही ते म्हणाले.

मागील काही दिवसांपासून चंद्रशेखर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत

चंद्रशेखर यांच्या भेटीनंतर हा वाद सोडवण्यासाठी नितीश कुमार यांनी के. के. पाठक यांच्याशी चर्चा केली आहे. मागील काही दिवसांपासून पाठक हे वेगवेळ्या कारणांसाठी चर्चेत येत आहेत. शिक्षण मंत्रालयात स्वच्छता ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीला कंत्राट दिले होते, त्याला दंड ठोठावला होता. तसेच मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळांना नियमतपणे भेट देऊन तपासणी करावी, असेही आदेश दिले होते.

चंद्रशेखर यांच्या मंत्रालयाने पाठक यांना पत्र पाठवल्यानंतर वाद चव्हाट्यावर

मागील अनेक दिवसांपासून के. के. पाठक आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यात वाद सुरू आहे. मात्र ४ जुलै रोजी चंद्रशेखर यांच्या मंत्रालयाने पाठक यांना एक पत्र लिहिल्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. या पत्रात चंद्रशेखर यांच्यातर्फे त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक यादव यांनी तीव्र नाराजी कळवली होती. “मागील काही दिवसांपासून माध्यमांत शिक्षण मंत्रालयासंदर्भात सातत्याने नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यांना शासन केले जात आहे. स्वच्छता, ड्रेस कोड याबाबत आक्षेपार्ह निर्णय घेतले जात आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. तसेच त्यांना निलंबितही केले जात आहे. याच कारणामुळे मंत्र्यांनी मला नाराजी कळवावी असे निर्देश दिले आहेत. आता रॉबिनहूड म्हणून वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे मंत्र्यांना वाटत आहे,” असे या पत्रात म्हणण्यात आले होते.

दरम्यान, या पत्रावर मंत्र्यांची सही नसल्यामुळे के. के. पाठक यांनी त्याला गांभीर्याने घेतलेले नाही. चंद्रशेखर यांचे खासगी स्वीय सहाय्यक कृष्णानंद यादव यांनीच हे पत्र लिहिले असावे, असे पाठक यांनी गृहित धरलेले आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनेदेखील यादव यांना पत्राच्याच माध्यमातून चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांचे चंद्रशेखर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाला चोख प्रत्युत्तर

शिक्षण विभागाच्या वतीने संचालक (प्रशासन) सुबोध कुमार चौधरी यांनी यादव यांना पत्र लिहिले आहे. तुमचे हे पत्र काहीही कामाचे नाही, त्याला काहीही महत्त्व नाही, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे. विशेष म्हणजे यादव यांना पदावरून हटवण्याची आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच यादव स्वत:च्या नावापुढे डॉ. अशी पदवी लावतात. या पदवीचीही चौकशी केली जात आहे, असे या पत्रातून सांगण्यात आले आहे. “साधारण आठवड्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना पत्रं लिहिली आहेत. तुम्ही खासगी सचिव आहात. तुम्ही शासकीय अधिकारी नाहीत. तुम्हाला योग्य ती काळजी घेण्याचे सांगण्यात आले होते. तुम्ही खासगी सचिव असल्यामुळे तुम्ही कोणत्याही सरकारी नोकराशी चर्चा, संवाद साधू नये अशी अपेक्षा होती. तुम्हाला दुसरे काम नाही, असे आम्हाला वाटते,” असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

जदयू, राजद पक्षांत मतभेद

या मुद्द्यावरून महायुतीतील जदयू आणि राजद या दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाले आहेत. राजद पक्षाचे प्रवक्ते तथा मानेर मतदारसंघातील आमदार भाई बिरेंद्र यांनी के. के. पाठक यांना लगाम घालावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर जदयू पक्षाचे प्रवक्ते नारज कुमार यांनी पाठक यांची स्तुती केली आहे. ते एक शिस्तप्रिय अधिकारी आहेत, असे ते म्हणाले आहेत.

चंद्रशेखर यांनी लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन हे प्रकरण लवकरात लवक मिटवावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण कोणते वळण घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.