जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी युती करून बिहारमध्ये महायुतीच्या रूपात नव्या सरकारची स्थापना केली. नितीश कुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडल्यापासून बिहारमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जदयू पक्षाचे नेते अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करायचे. मात्र, हेच नेते आता मोदी आणि भाजपावर सडकून टीका करताना दिसतात. भाजपा नेत्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोप आणि टीकेच्या राजकारणाचा परिणाम बिहारमधील विकासकामांवर पडत आहे. बिहारमध्ये प्रस्तावित असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महाविद्यालय राजकारणामुळे रखडले आहे.
तेजस्वी यादव यांची मोदी सरकारवर टीका
बिहारमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे एक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रस्तावित आहे. मात्र, येथील राजकीय स्थितीमुळे या महाविद्यालयाचे काम रखडले आहे. एम्स रुग्णालय उभारण्यासाठीच्या जागेवरून महायुती आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षेत्रीय पंचायती राज परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘दरभंगा एम्स’ असा उल्लेख केला. मोदी यांच्या या विधानावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी टीका केली. “केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स रुग्णालयासाठीचे स्थान आणि जागा अद्याप ठरवलेली नाही. असे असताना हे विकासाच्या मुद्द्यावरून राजकारण का केले जात आहे. जागाच निश्चित झालेली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा येथील एम्स रुग्णालय, असा उल्लेख करीत आहेत,” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
“… हे फार दुर्दैवी आहे”
एम्स रुग्णालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने एकूण १५१ एकर जमीन दिली होती. मंत्रिमंडळाने एकूण ३०० कोटी रुपयांचा निधीदेखील यासाठी मंजूर केला आहे, असा दावाही तेजस्वी यादव यांनी केला. आम्ही विकासाच्या राजकारणावर भर देतो. मात्र, केंद्र सरकारने या प्रकल्पाला अद्याप मंजुरी दिलेली नाही, हे फार दुर्दैवी आहे, असेही यादव म्हणाले.
… म्हणून केंद्राने प्रस्ताव फेटाळला
तेजस्वी यादव यांच्या या टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहार सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महायुती सरकारने एप्रिल महिन्यात एम्स रुग्णालयाची प्रस्तावित जागा का बदलली, असा सवाल त्यांनी केला. महायुती सरकारने रुग्णालयाची जागा बदलण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्र सरकारने तो मे महिन्यात फेटाळला होता. राज्य सरकारची प्रस्तावित जागा खोल आहे आणि तेथे पाणी जमा होण्याची शक्यता आहे, असे कारण सांगून केंद्र सरकारने तो प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, तरीदेखील दरभंगा विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्यामुळे बिहार सरकार याच जागेवर ठाम आहे.
“रुग्णालयाची जागा का आणि कोणाच्या फायद्यासाठी बदलली?”
“विकासाच्या बाबतीत मोदी सरकार राजकारण करीत नाही. आमचा उद्देश स्पष्ट आहे. नियमानुसार बिहार सरकारने रुग्णालयासाठी प्रस्तावित केलेल्या दुसऱ्या जागेचे तज्ज्ञ समितीने परीक्षण केले. त्या समितीला ती जागा योग्य वाटली नाही. बिहार सरकारने रुग्णालयाची जागा का आणि कोणाच्या फायद्यासाठी बदलली?” असा सवाल मांडवीय यांनी केला.
जदयूच्या १५ आमदारांचे केंद्र सरकारला पत्र
मिळालेल्या माहितीनुसार १९ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत १२६४ कोटी रुपये खर्चाच्या एम्स रुग्णालयाच्या उभारणीचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर बिहार सरकारने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी हे रुग्णालय उभारण्यासाठी पहिल्यांदा जागा निश्चित केली होती. मात्र, गेल्या वर्षी नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत महायुतीच्या रूपात नव्याने सरकारची स्थापना केली आणि एम्स रुग्णालयाचे भवितव्य अंधकारमय झाले. कारण- जदयूच्या १५ खासदारांनी एम्स रुग्णालय हे दरभंगा येथील कोसी प्रदेशाऐवजी सहरसा येथे उभारण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. तोपर्यंत राजदचे नेते भोला यादव यांनी दरभंगातील हयाघाट येथील बंद पडलेल्या पेपर मिलची जागा एम्स रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
२० एप्रिल रोजी राज्य सरकारने एम्स रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावित जागेत बदल केला. हयाघाटऐवजी शोभान बायपास येथे १५१ एकर जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २६ मे रोजी बिहारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना (आरोग्य) पत्र लिहून रुग्णालयाच्या नव्या जागेचा प्रस्ताव फेटाळला.
“नरेंद्र मोदी यांनी श्रेय द्यावे लागेल म्हणून …”
त्यानंतर आता बिहार आणि केंद्र सरकार यांच्यात एम्स रुग्णालयावरून वाद सुरू आहे. भाजपाचे नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांना यासाठी जबाबदार धरले. “केंद्र सरकारने बिहार राज्यााठी दोन एम्स रुग्णालये मंजूर केली. प्रत्येक राज्यात एक एम्स रुग्णालय, असा नियम आहे. मात्र बिहार, जम्मू-काश्मीर या राज्यांसाठी अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार यांनी डीएमसीएच रुग्णालयात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोणत्याही ग्रीनफिल्डवर रुग्णालय उभारणे हे केंद्र सरकारच्या नियमांच्या विरोधात आहे. एम्स रुग्णालय उभारण्यासाठी नितीश कुमार यांनी अन्य ठिकाण शोधले. मात्र, दुसऱ्या प्रस्तावित ठिकाणी रुग्णालय उभारण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. नरेंद्र मोदी यांना श्रेय द्यावे लागेल म्हणून नितीश कुमार यांना हा प्रकल्प पूर्ण व्हावा, असे वाटत नव्हते”, अशी टीका सुशील कुमार मोदी यांनी केली.