अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारमध्ये सीता मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच बिहार सरकारकडून सीतामढी येथे ५० एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पौराणिक कथांनुसार सीतामढी हे प्रभू श्रीरामाची पत्नी सीतेचे जन्मस्थान आहे.
महत्त्वाचे म्हणजे सद्य:स्थितीत सीतामढी येथे सीतेच मंदिर अस्तित्वात आहे. मात्र, हे मंदिर १०० वर्षांपूर्वीचे आहे. तसेच ते आता जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे आमचा या ठिकाणी सीतेचे भव्य मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न आहे, असे भाजपाकडून सांगण्यात आले. या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना भाजपाचे माजी आमदार कामेश्वर चौपाल म्हणाले, “सीतामढी हे हिंदू धर्मीयांसाठी पवित्र स्थान आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकतेच अयोध्येत राम मंदिर बांधण्यात आले आहे. आता जगभरातील लोक प्रभू रामाच्या दर्शनसाठी येतील. त्यामुळे त्यांना सीतेच्या जन्मस्थळालाही भेट द्यायला आवडेल. म्हणूनच सीतामढी येथे भव्य मंदिर उभारले जावे”, अशी आमची इच्छा आहे. कामेश्वर चौपाल हे अयोध्येतील राम मंदिर स्ट्रस्टचे विश्वस्तदेखील आहेत.
हेही वाचा – बिहार खरंच सीतेचे जन्मस्थान आहे का? काय सांगतात पौराणिक संदर्भ?
विशेष म्हणजे सीतामढी येथील मंदिरासाठी बिहार सरकारने काही दिवसांपूर्वीच १६.६३ एकर जमीन अधिग्रहित केली होती. आता मंदिर परिसराच्या पुनर्विकासासाठी आणखी ५० एकर जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. राम मंदिराप्रमाणेच सीतामढी येथील मंदिरही लोकवर्गणीतून बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.
“सरकार मंदिर बांधू शकत नाही. मात्र, येथे भव्य मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी सरकार जमीन अधिग्रहित करीत आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रधान सचिव डॉ. एस. सिद्धार्थ यांनी दिली. तसेच जेव्हा एखादे मंदिर बांधले जाते. तेव्हा त्या ठिकाणी पर्यटकही वाढतात. मग साहजिकच त्यांच्यासाठी सार्वजनिक सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्यानुसार या भागातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, आम्ही भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. सीतामढी तीर्थस्थळ तिरुपती बालाजीप्रमाणेच विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : आयारामांना संधी दिल्यामुळे सपात नाराजीनाट्य; पक्षांतर्गत असंतोष वाढणार?
दरम्यान, सीतामढी हे केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेचा एक भाग आहे. या योजनेंतर्गत रामायणात उल्लेखिलेल्या प्रमुख १५ स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. देशातील धार्मिक पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. खरे तर या मंदिराची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु अयोध्येतील राम मंदिरानंतर सीतामढी येथे भव्य सीता मंदिर बांधावे या मागणीने जोर धरला आहे. बिहार सरकारने मंदिर परिसराच्या पुनर्विकासासाठी ७२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.