देशात सध्या लोकसभेची निवडणूक पार पडते आहे. या निवडणुकीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. केरळ वगळता देशातील इतर राज्यांमध्ये डाव्या पक्षांची ताकद कमी आहे. बिहारमध्येही याहून वेगळे चित्र नाही. बिहारमधील महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलाबरोबर छोटे डावे पक्षही सामील आहेत. बिहारमध्ये खागरिया मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एकमेव उमेदवार रिंगणात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९१ नंतर पहिल्यांदाच माकपने खागरियामधून उमेदवार दिला आहे. या मतदारसंघाच्या शेजारचा बेगुसराय हा मतदारसंघ कधी काळी ‘बिहारचा लेनिनग्राड’ म्हणून ओळखला जायचा. कारण- १९५० पासून या ठिकाणी डाव्या चळवळींचे प्रमाण अधिक होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन पक्षाने नालंदा, आरा व काराकत या मतदारसंघांतून आपले उमेदवार दिले आहेत.

हेही वाचा : अखिलेश यादवांची प्रतिष्ठा पणाला; गमावलेला गड परत मिळवण्यासाठी झुंज पण मतदारांचा कल भाजपाकडे?

डाव्या पक्षाचा उमेदवार चर्चेत

खागरिया मतदारसंघासाठी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. या ठिकाणी माकपचे संजय कुमार आणि लोक जनशक्ती पार्टीचे राजेश वर्मा यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. माकपचे संजय कुमार हे स्वत: ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजदबरोबर महाआघाडीमध्ये असल्याने त्यांना मुस्लीम आणि यादव समाजाकडूनही पाठिंबा मिळतो आहे.

या मतदारसंघामध्ये कुशवाह समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी करते आहे. ती M-Y-K (मुस्लीम-यादव-कुशवाह) या सूत्रावर आपली भिस्त ठेवून आहे. माकपला या समाजांकडून ५०-६० टक्के पाठिंबा जरी मिळाला तरी कुमार येथे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खागरिया मतदारसंघामध्ये १८ लाख मतदार आहेत. त्यापैकी मुस्लीम तीन लाख, यादव अडीच लाख आणि कुशवाह व मल्लाह समाजाचे प्रत्येकी एक लाख मतदार आहेत. मल्लाह हा अत्यंत मागासवर्गीय समाज आहे.

या ठिकाणचे विद्यमान खासदार चौधरी मेहबूब अली कैसर हे बिहारमधील एनडीएचे एकमेव मुस्लीम खासदार आहेत. ते या मतदारसंघात लोकप्रियही आहेत. मात्र, यावेळी लोजपाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी एनडीएला राम राम करून राजदमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी संजय कुमार यांना सक्रिय पाठिंबा दिला असल्यामुळे इथे त्यांचे पारडे जड झाले आहे.

ते म्हणाले, “आता या प्रचारामध्ये मी उतरल्यामुळे या ठिकाणी अधिक तगडी टक्कर होणार आहे. मला तिकीट नाकारण्यात आल्यामुळे मुस्लिमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना आहे. एनडीएला पराभूत करणे हेच माझे एकमेव लक्ष्य आहे.” मुकेश साहनी यांच्या नेतृत्वाखालील विकसनशील इन्सान पार्टीनेही महाआघाडीला साथ दिली आहे. साहनी हे मल्लाह समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या प्रचारामुळे मल्लाह समाज संजय कुमार यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता अधिक आहे.

संजय कुमार यांचे वडील योगेंद्र सिंग हे २००० ते २००५ च्या दरम्यान खागरिया सादर मतदारसंघाचे आमदार होते. संजय कुमार स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवरील सर्व समस्यांचा उल्लेख करीत प्रचार करीत आहेत. “स्थलांतर आणि पुराचा धोका या खागरियाच्या सर्वांत मोठ्या समस्या आहेत. मी निवडून आलो, तर या मुद्द्यांवर नक्कीच काम करीन,” असे संजय कुमार यांनी कोसी गावातील प्रचारसभेत म्हटले आहे.

लोक जनशक्ती पार्टीची काय आहे रणनीती?

दलित हा लोजपाचा पारंपरिक मतदार आहे. अत्यंत मागासवर्गीय आणि यादवेतर आणि कुशवाह वगळता, इतर ओबीसी मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा एनडीएचा प्रयत्न राहील. ग्रामीण भागामध्ये नरेंद्र मोदींची मोफत धान्यवाटपाची योजनाही लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचाही फायदा मते मिळविण्यासाठी होऊ शकतो.

हेही वाचा : भाजपाने मतांसाठी शिखांच्या धार्मिक बाबींमध्ये लुडबूड करु नये; शिरोमणी अकाली दलाची टीका

राकेश मंडल या शेतकऱ्याने म्हटले, “गेल्या तीन निवडणुकांमध्ये महाआघाडीला मुस्लीम-यादवांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर असूनही एनडीएचाच उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या वेळीही तगडी टक्कर होण्याची शक्यता आहे. एनडीएला नरेंद्र मोदींच्या नावावरही अनेक मते मिळण्याची शक्यता आहे.”

या मतदारसंघातील लढतीविषयी बोलताना तिथले रहिवासी रविनेश सिंह म्हणाले, “दोन्हीही उमेदवारांची स्वप्ने विकण्याची पद्धत वेगवेगळी आहे. एकीकडे माकप शेतकऱ्यांविषयी बोलतो आहे; तर दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश किती प्रगती करतो आहे, हे लोजपा सांगत आहे. मात्र, खागरियाला अधिकाधिक रोजगार कोण देईल, हा आमचा प्रश्न आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar loksabha election 2024 cpm khagaria left party vsh