बिहारमधील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दल अर्थात जदयू पक्षात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नितीश कुमार यांनी राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना हटवून जदयू पक्षाचे अध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे. आगामी काही महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला चांगलेच महत्त्व आले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून जदयू पक्षातील नेते नाराज आहेत, असे म्हटले जात होते. त्यामुळे पक्षाचे नियंत्रण स्वत:कडे राहावे यासाठीही नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता बिहारच्या माहाआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लल्लन सिंह यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून लल्लन सिंह यांची राजद पक्षाशी जवळीक वाढल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर नितीश कुमार यांनी सिंह यांच्याकडचे पक्षाध्यक्षपदाचे अधिकार काढून स्वत:ची पक्षाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीनेही त्याला संमती दिली आहे. नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी ते जमेल त्या मार्गाने विरोधकांच्या इंडिया आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता पक्षातील गटबाजी आणि संभाव्य पक्षफुटी टाळण्यासाठी पक्षाचे सर्व अधिकार त्यांनी स्वत:कडे घेतले आहे.

तेजस्वी यादव यांचा विदेशदौरा रद्द

या सर्व घडामोडीनंतर बिहारच्या महाआघाडीतील महत्त्वाचे राजद आणि जदयू या पक्षांतही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. सध्याच्या अस्थिरतेकडे पाहून बिहारचे उपमुख्यमंत्री तथा राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी त्यांचा ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द केला आहे. येत्या ६ जानेवारीपासून या दौऱ्याची सुरुवात होणार होती. तेजस्वी यादव यांच्या या दौऱ्याबाबत राजद पक्षातील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “आम्हाला अशा परिस्थितीत आमच्या नेत्याला विदेशात पाठवून कोणताही धोका पत्करायचा नाही. सध्या राज्याच्या राजकारणात अस्थिरता आलेली असताना आम्हाला आमच्या नेत्याला विदेशात पाठवायचे नाही,” असे या नेत्याने सांगितले.

नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात तणाव?

“डिसेंबर महिन्यात एकूण चार कार्यक्रम असे आहेत, ज्यात तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासोबत एका मंचावर येण्याचे टाळले. आमच्या युतीत तणाव असल्याचे हे लक्षण आहे. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षणे अनेकदा टीका केलेली आहे. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यात कुशासन होते, असे म्हणत त्यांनी अनेकवेळा तेजस्वी यादव यांना लक्ष्य केलेले आहे,” असेही या नेत्याने म्हटले.

“मंत्रिमंडळ विस्तार झाला तरच…”

नितीश कुमार यांनी लल्लन सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर केल्यामुळे राजद आणि जदयू या पक्षांत एकमेकांविषयी अविश्वास निर्माण झालेला आहे. मात्र हा अविश्वास कोणीही सार्वजनिक करत नाहीये, असे राजद पक्षातील सूत्रांनी सांगितले. बिहारमधील सध्याच्या स्थितीवर बोलताना राजदच्या आणखी एका नेत्याने सूचक विधान केले. आमच्यासाठी आगामी महिना हा फार महत्त्वाचा असणार आहे, असे या नेत्याने सांगितले. “आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार हवा आहे. लवकरात लवकर हा विस्तार व्हावा असे आम्हाला वाटते. त्यानंतरच आमची महाआघाडी ही लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, यावर विश्वास बसेल. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर लोकसभा निवडणुकीला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाता येईल,” असे हा नेता म्हणाला.

“नितीश कुमार आघाडीत कायम राहणार”

विशेष म्हणजे सध्या दोन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना राजदच्या या नेत्याने नितीश कुमार हे महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला आहे. बिहार विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेऊन या नेत्याने तसा दावा केला आहे.

“…तर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाऊ शकते”

“राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या ही ११४ आहे. बहुमतासाठी फक्त ८ आमदारांची गरज आहे. नितीश कुमार हे पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाहीत. कारण तसे केल्यास त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाऊ शकते. नितीश कुमार जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंतच त्यांना महत्त्व आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदी कायम राहतील,” असा अंदाज या नेत्याने व्यक्त केला.

२०२० सालच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

दरम्यान, २०२० सालच्या विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजद आणि भाजपा या पक्षांपेक्षाही कमी जागा मिळाल्या होत्या. या निवडणकुीत जदयू पक्षाचा फक्त ४३ जागांवर विजय झाला. भाजपाने एकूण ७४ जागांवर विजय मिळवलेला आहे. राजद पक्षाला एकूण ७५ जागा मिळालेल्या आहेत. नितीश कुमार यांची अगोदर भाजपाशी युती होती. मात्र ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी राजद आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar politics tension between rjd and jdu tejashwi yadav cancels his australia tour prd
Show comments