Who is Nitish Kumar son: बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. जनता दल (संयुक्त) पक्षाचे (जेडीयू) नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृतीविषयी विविध चर्चा समोर येत आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत वर्तविले आहे. जानेवारी महिन्यापासून नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार राजकारणात येण्याची चर्चा सुरू होती. आता या चर्चांना आणखी बळ मिळताना दिसत आहे. जेडीयूचे नेते याबाबत जाहीर विधान करत नसले तरी निशांत कुमार यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पक्षाला नवी संजीवनी मिळेल, असे खासगीत म्हटले जात आहे.
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी एक लेख प्रकाशित केला आहे. जेडीयूच्या एका नेत्याने सांगितले की, सध्या निशांत कुमार यांचा पक्षातील कार्यक्रमात अतिशय मर्यादित सहभाग आहे. काही मोजक्या कार्यक्रमांनाच ते वडिलांबरोबर हजर राहतात.
एका नेत्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, आतापर्यंत निशांत पक्षाच्या कामात सहभागी झालेले नाहीत. तसेच ते बैठकांनाही हजेरी लावत नाहीत. निशांत यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत नितीश कुमार यांनी अद्याप संकेत दिलेले नाहीत. या नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, निशांत राजकारणात उतरले तर ती पक्षाची हानी असेल. कारण नितीश कुमार यांनी आजवर विरोधकांच्या घराणेशाहीच्या राजकारणाला लक्ष्य करत आपले राजकारण पुढे केले होते.
“नितीश कुमारांनी कधीही घराणेशाहीच्या राजकारणाला थारा दिला नाही. आपल्या सार्वजनिक जीवनातही त्यांनी हाच आदर्श घालून दिला. लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची कमान त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या हाती सोपवली. या राजकारणावर नितीश कुमार टीका करत आले आहेत”, असेही जेडीयूच्या नेत्याने म्हटले. तसेच जेडीयूने आता भविष्यातील राजकारणासाठी तयार राहिले पाहीजे. नितीश कुमार यांच्यानंतर कोण? हा पक्षासमोर प्रश्न उभा आहे, असेही ते म्हणाले.
आणखी एका नेत्याने सांगितले की, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जेडीयूच्या रुपात एक शक्तीशाली पक्ष निर्माण केला. २० वर्ष राज्यातील सत्ता राखली. परंतु त्यांनी पुढच्या पिढीतील नेतृत्व पक्षात निर्माण केले नाही.
नितीश कुमार यांच्यानंतर नेतृत्वाची वाणवा
या नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पुढे म्हटले, “बिहारच्या राजकारणात जातीय समीकरण खोलवर रुजले आहे. मागासवर्गीय समाजातील नेताच पक्षाचे नेतृत्व करून राज्यात सत्ता टिकवू शकतो, असा समज आहे. पण जेडीयूमधील नितीश कुमार यांच्यानंतरचे वरिष्ठ नेते राजीव रंजन सिंह किंवा संजय झा हे वरच्या जातीमधून येतात. नितीश कुमार यांनी ओबीसी किंवा ईबीसी वर्गातून येणारा आणि राज्यव्यापी ओळख असलेला नेताच निर्माण केला नाही. त्यामुळेच नितीश कुमार यांचा अस्त झाल्यानंतर पक्षाचे भविष्य अनिश्चित मानले जाते. जर निशांत राजकारणात उतरला तर इतर पक्ष आणि जेडीयूमध्ये काहीही अंतर उरणार नाही. पण तरी पक्षाला यानिमित्ताने थोडा वेळ का होईना नवसंजीवनी मिळेल.”
निशांत कुमार यांचा वाढता वावर
निशांत कुमार यांनी वडील मुख्यमंत्री असतानाही प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी माध्यमांशी बोलत असताना म्हटले, “बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी एनडीएने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून घोषित करायला हवे.” याशिवाय त्यांनी स्वतःच्या राजकीय इच्छा कधीही बोलून दाखविलेल्या नाहीत.
कोण आहे निशांत कुमार?
निशांत कुमार (४८) हा नितीश कुमार आणि त्यांची दिवंगत पत्नी मंजू सिन्हा यांचा एकुलता एक मुलगा आहे. निशांतने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त केलेली आहे. निशांतला राजकारणात रस नाही, असेच आतापर्यंत मानले जात होते. पण त्यांच्या राजकारणात प्रवेशाबाबत वावड्या उठल्यानंतर एनडीए आणि विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिक्षित तरुणांनी राजकारणात यायला हवे, असे दोन्ही बाजूंनी म्हटले जात आहे.
निशांत कुमार यांनी जेडीयूमधून राजकारणात प्रवेश केल्यास नितीश कुमार यांना विरोधकांना तोंड द्यावे लागू शकते.