बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला अवघे काही दिवस बाकी आहेत. १२ फेब्रुवारी रोजी नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. असे असताना नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारसमोर आता वेगळंच आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बिहार विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी अद्यापही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे भाजपा, जेडीयू आणि आरजेडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आरजेडीचे वरिष्ठ नेते म्हणाले, १२ फेब्रुवारी रोजी नितीश कुमार बहुमत सिद्ध करू शकतील की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण हिंदुस्थानी अवाम मोर्चाने (सेक्युलर) त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवाय नितीश यांच्या राजकारणामुळे जेडीयूतील काही आमदारही नाराज असल्याची माहिती आहे, अशा वेळी विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असेल.

हेही वाचा – “आम्ही सांगून सांगून थकलोय”; इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या प्रतीक्षेनंतर आसाममधील ‘आप’ने तीन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

आकडेवारीचा विचार केला तर विधानसभेतील एकूण २४३ आमदारांपैकी महागठबंधनकडे ११४ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना बहुमतासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे. समजा मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने महागठबंधनला पाठिंबा दिला तरी त्यांना बहुमतासाठी चार आमदार कमी पडतात. जर मांझी यांच्या पक्षाने आणि अन्य एका अपक्ष आमदाराने एनडीएला पाठिंबा दिला, तर एनडीएकडे १२८ आमदारांचे पाठबळ असेल

याशिवाय आणखी एक शक्यता म्हणजे, जर सत्ताधारी पक्षातील म्हणजे जेडीयू किंवा भाजपाचे आमदार फुटले, तर नितीश कुमार यांचे सरकार पडू शकते. यासंदर्भात बोलताना भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी एनडीएकडे पुरेसे आमदार आहेत. आमच्या आमदारांविषयी चिंता व्यक्त करण्यापेक्षा महागठबंधनने स्वत:चे आमदार एकत्र राहतील की नाही, याचा विचार करावा.

विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांविरोधात एनडीएच्या सर्वच आमदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी एकतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्वास प्रस्तावर मतदान झाल्यास त्यांच्यावर पदावरून दूर होण्याची नामुष्की ओढवेल.

यासंदर्भात बोलताना विधानसभेचे उपसभापती तथा जेडीयूचे नेते माहेश्वर हजारी म्हणाले, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना, त्यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. तसेच सभागृहाला त्यांचा नवा अध्यक्ष निवडू द्यायला हवा होता. मात्र, ते पक्ष अध्यक्षांच्या सांगण्यानुसार आपल्या पदावर कायम आहेत.

यासंदर्भात बोलताना अवध बिहारी चौधरी म्हणाले, माझ्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. त्यापूर्वी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे १४ दिवसांचा कालावधी बाकी आहे. हा कालावधी संपेपर्यंत मी अध्यपदी असेन, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

दरम्यान, २०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार एनडीए सोडून महागठबंधनमध्ये सहभागी झाले तेव्हा भाजपाचे नेते विजय कुमार सिन्हा विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावरील मतदानापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. अवध बिहारी चौधरीदेखील अशाचप्रकारे राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘अर्थव्यवस्था’ असेल मुख्य मुद्दा? श्वेतपत्रिकेनंतर भाजपाची नेमकी रणनीती काय?

कोण आहेत अवध बिहारी चौधरी?

अवध बिहारी चौधरी यांनी १९९५ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले. मात्र, त्यानंतर त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला. १९९० आणि १९९५ मध्ये ते जेडीयूच्या तिकिटावर आमदार झाले, पण २००५ साली त्यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. मात्र, फेब्रुवारी २००५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुढच्या दोन विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. २०१० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदामुळे ते २०१५ मध्ये पुन्हा आरजेडीमध्ये परतले. ते आता आरजेडीचे आमदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar trust vote on february 12 but speaker not yet resigned will be new challenge for nda spb
Show comments