भाजपाकडून दोन वेळा खासदार राहिलेले व माजी केंद्रीय राज्यमंत्री जसवंतसिंह भाभोर आणि त्यांचे आमदार असलेले भाऊ शैलेश भाभोर हे २००२ साली घडलेल्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शैलेश चिमनलाल भट्टसोबत एकाच मंचावर दिसले. दाहोद जिल्ह्यातील करमाडी गावात २५ मार्च रोजी एका कार्यक्रमानिमित्त जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही लोकप्रतिनिधी बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत दिसल्यामुळे गुजरातमधील राजकारण तापले आहे. तर राजकीय जाणकारांनी सांगितले की, या लोकप्रतिनिधींचे आरोपीसोबत आधीपासूनच जवळचे संबंध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसवंतसिंह भाभोर यांचे भाऊ आमदार शैलेश भाभोर यांनी दाहोद या आदिवासी जिल्ह्यातील निवडणुकीत चांगले काम केल्यामुळे भाजपात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. तसेच प्राथमिक शाळेत शिक्षक राहिलेले जसवंतसिंह यांना १९९५ साली विधानसभा निवडणुकीसाठी रंधिकापूर येथून उमेदवारी मिळाली. या मतदारसंघातून भाजपाने एकदाही विजय मिळवला नव्हता. मात्र जसवंतसिंह यांनी उमेदवारी मिळताच आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

जनसंघापासून आरोपी शैलेश भट्ट यांची जसवंतसिंहसोबत जवळीक

भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने सांगतिले की, जसवंतसिंह भाभोर यांचे कुटुंब जनसंघाशी पूर्वीपासून जोडले गेलेले होते. त्यांचे वडील सुमनभाईदेखील शिक्षक होते, त्यांनीही दाहोद आणि पंचमहल या आदिवासी क्षेत्रात जनसंघाचे काम केले होते. आरोपी शैलेश भट्ट यांनी जसवंतसिंह यांना तयार केले, तसेच राजकारणात प्रवेश करण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत.

शिक्षा नसती झाली तर जसवंतसिंह यांच्या जागी शैलेश भट्ट असते

भाजपाच्या नेत्याने सांगितले की, एकाच गावातले असल्यामुळे भट्ट आणि भाभोर यांच्यामध्ये जवळीक आहेच. शैलेश भट्ट २००२ च्या आधी दाहोदच्या सिंगवाड गावचे सरपंच होते. जिल्ह्यातील एक शक्तिशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जर बिल्किस बानो प्रकरणात त्यांना दोषी ठरविले गेले नसते, तर जसवंतसिंह यांच्या जागी आज ते असते. याआधीदेखील भट्ट जेव्हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर यायचे तेव्हा जसवंतसिंह यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावायचे.

दाहोद हा भाजपासाठी एक महत्त्वपूर्ण आदिवासी जिल्हा मानला जातो. त्यामुळे आरोपीसोबत व्यासपीठावर एकत्र आले तरी जसवंतसिंह यांच्यावर पक्ष नाराज होणार नाही. कारण भाभोर आता जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते बनले आहेत. शैलेश भट्ट यांचे भाऊ मितेशदेखील याच सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी आहेत. तसेच जसवंतसिंह यांचे साहाय्यक असलेले रमेश चंदनादेखील या प्रकरणात आरोपी होते.

मुस्लीम समाज नाराज

खासदार आणि आरोपीला अशा प्रकारे एकाच व्यासपीठावर पाहिल्यामुळे रंधिकपूरमधील मुस्लीम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका साक्षीदाराने सांगितले की, जसवंतसिंह आणि आरोपी भट्ट हे काही पहिल्यांदाच एकत्र दिसत नाहीत. याआधीदेखील जेव्हा जेव्हा भट्ट पॅरोलवर बाहेर आले होते, तेव्हा तेव्हा खासदार जसवंतसिंह यांच्यासोबत त्यांना पाहिले गेले आहे. आम्ही पोलीस प्रशासन आणि गृह खात्याला याबाबत पत्र लिहून तक्रारदेखील केली, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

या वेळी खासदार आणि आरोपी एकाच व्यासपीठावर दिसले, तो सरकारी कार्यक्रम होता. २५ मार्च रोजी जलजोडणी आणि भुयारी गटार योजनेचा शुभारंभ करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची छायाचित्रे दाहोद जनसंपर्क विभागाने माध्यमांना पाठवली. या छायाचित्रांमध्ये आरोपी भट्ट दिसून आल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी निमंत्रणपत्रिकेवरून स्वतःचे हात झटकले. जसवंतसिंह यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर शैलेश भट्ट यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ते कार्यक्रमाच्या वेळी व्यस्त असल्यामुळे त्यांनी व्यासपीठावर इतर कोण बसले आहेत, याकडे लक्ष दिले नाही.