गणेश जेवरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जामखेड तालुक्यातील चौंडी येथील जयंती उत्सव सोहळा हाही राजकारणाचा आखाडा होऊ पाहत आहे, हे मंगळवारी झालेल्या येथील दोन जयंती उत्सव, आणि जाहीर सभांवरून अधोरेखित झाले. राज्यात सध्या विविध राष्ट्रपुरुषांवरून राजकारण होताना दिसते. यापूर्वीही पाथर्डीजवळील भगवान गडाप्रमाणे फलटणजवळील नायगाव आणि आता चौंडीचा समावेश झाला आहे. मराठा, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे तिन्ही प्रश्न राजकारणातील कळीचे प्रश्न आहेत. अहिल्यादेवी जयंती सोहळ्यासही ही पार्श्वभूमी आहे. धनगर समाज व त्यांच्या नेत्यांनी आरक्षणासह प्रत्येक प्रश्नावर शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचाच नातू आमदार रोहित पवार यांनी अहिल्यादेवी जयंती मोठ्या स्तरावर साजरी केली.
राज्यभरातून समाजबांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने यावेत, यासाठी आमदार पवार यांनी शासकीय यंत्रणेची मदत घेतल्याचे लक्षात येताच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाफगाव ते चौंडीपर्यंतची जनजागृती यात्रा काढली. आपण कोणत्याही परिस्थितीत चौंडीत जाणारच, असा निर्धार व्यक्त करत पडळकर यांनी चौंडीत जाहीर सभेची परवानगी मागितली होती. यात्रेतही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत त्यांच्यावर आरोप केले. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत या जयंती उत्सवाचे श्रेय मिळू न देण्याचे त्यांचे प्रयत्न होते.
गोपीचंद पडळकर यांना चौंडी येथील जाहीर सभेसाठी प्रशासनाने दुपारी तीननंतर परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात दुपारी साडेबाराच्या सुमारास पडळकर चौंडीजवळ पोचले. ते जर चौंडीत पोहोचले असते तर नक्कीच त्या ठिकाणी गोंधळ झाला असता हे लक्षात घेऊन, पोलीस-प्रशासनाने त्यांना कर्जत तालुक्यात रोखले. दुपारी दोनला त्यांचे चौंडीत आगमन झाल्यावर जाहीर सभाही घेण्यात आली. पडळकर यांच्या सभेत उपस्थित सर्वच वक्त्यांनी शरद पवार, रोहित पवार व महाआघाडी सरकारवर प्रखर टीका केली.
शरद पवार व त्यांचे नातू रोहित पवार व उपस्थित सर्वच नेत्यांनी या वेळी अतिशय संयमी भाषणे केली. कोणावरही टीका न करता अहिल्यादेवींचे जीवनकार्य आणि धनगर समाजासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल, या परिसराचा विकास कसा करता येईल, यावरच सर्व वक्त्यांनी भर दिला. वास्तविक माजी मंत्री अण्णा डांगे यांनी खऱ्या अर्थाने चौंडीच्या विकासासाठी ते स्वतः मंत्री असताना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर सातत्याने निधी आणून, या परिसराचा विकास करत हे क्षेत्र राज्य व देशाच्या नकाशावर आणले.
चौंडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष होणार, असे चित्र सर्वत्र निर्माण झाले होते. त्याचा परिणाम आज दिसून आला. जयंती उत्सवासाठी राज्यातून चौंडीत मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरून यापूर्वी संसदेच्या तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत गोंधळ झाला होता. त्याच्या आठवणी समाज बांधवांच्या मनात कायम असल्याने यंदा अभिवादनासाठी चौंडीत भाविकांची संख्या तुलनेने कमी होती.
चौंडी या अहिल्यादेवींच्या पवित्र जन्मस्थळाचा वापर मात्र आता राजकारणासाठी होत असल्याचेे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी माजी मंत्री महादेव जानकर यांनी या ठिकाणी जयंती उत्सव सोहळा सुरू केला. मात्र त्यांनीही या सोहळ्याच्या निमित्ताने समाजाचे संघटन करत त्याचा राजकीय वापर करण्यावर भर दिला होता. त्यांच्यानंतर मंत्री झाल्यावर राम शिंदे यांनीही जाणकारांना चौंडी येथून बाजूला ठेवून शासकीय जयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि तोच पायंडा आमदार रोहित पवार यांनी आता या ठिकाणी सुरू ठेवला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी आदर्श राज्यकर्त्याचा लौकिक मिळवलेला असताना दुर्दैवाने त्यांच्या जयंतीचा वापर सर्वच पक्षांकडून राजकारणासाठी होणे, दुर्दैवी आहे.