आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवता यावा म्हणून ओडिसा राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या बिजू जनता दलाने (बीजेडी) तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी या पक्षाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकत बीजेडी पक्षाचे वरिष्ठ नेते, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, या बैठकीत विधानसभेच्या सर्व १४७ मतदारसंघांत जाऊन पक्षाने केलेले काम तसेच राज्य सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती देण्याचे ठरवण्यात आले आहे.
जागा आणि मतदानाचे प्रमाण कसे वाढवता येईल, यावर चर्चा
नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीजेडी पक्षाचे प्रमुख तथा ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे होते. दोनपेक्षा जास्त तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जागा आणि मतदानाचे प्रमाण कसे वाढवता येईल, यावर चर्चा करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ साली या पक्षाला एकूण ४३.४ टक्के मतं मिळाली होती. २०१९ सालच्या निवडणुकीत हे प्रमाण काहीसे वाढले होते. २०१९ सालच्या निवडणुकीत या पक्षाला ४४.७ टक्के मते मिळाली होती.
भाजपा, बीजेडी पक्षाला किती मते?
लोकसभेच्या निवडणुकीत बीजेडी पक्षाची मते वाढली असली तरी दुसरीकडे भाजपाचे प्रस्थदेखील या राज्यात चांगलेच वाढले आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाला फक्त १८ टक्के मते मिळाली होती. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत मतांचे प्रमाण हे ३२.५ टक्क्यांपर्यंत वाढले होते. लोकसभेच्या निवडणुकीतही हीच स्थिती आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बीजेडी पक्षाला ४४.८ टक्के तर भाजपाला २१.९ टक्के मते मिळाली होती. २०१९ साली बीजेडीला ४३.३ टक्के तर भाजपाला ३८.९ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाची मतं वाढलेली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी बीजेडी पक्षाने आतापासूनच योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
बीजेडीचे कार्यकर्ते ओडिसातील सर्व १४७ विधानसभा मतदारसंघांत जाणार
भाजपाच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी बीजेडीने ओडिसामध्ये खास रणनीती आखली आहे. आगामी काळात बीजेडी पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर ओडिसातील सर्व १४७ विधानसभा मतदारसंघांत जाऊन हे कार्यकर्ते राज्य सरकारने आतापर्यंत काय-काय केले, याची माहिती सामान्य जनतेला देणार आहेत. याबाबत बोलताना “प्रत्येक मतदारसंघातून साधारण २०० कार्यकर्ते निवडले जाणार आहेत. पक्षाच्या मुख्यालयात या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जाऊन लोकांना, गरीब जनतेला राज्य सरकारच्या कामाबद्दल सांगणार आहेत. खेड्यातील प्रत्येक कुटुंबाला राज्य सरकारच्या कोणत्यातरी योजनेचा फायदा झालेलाच आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील मतदारांत जाऊन या योजनांबद्दल त्यांची मतं जाणून घेणार आहेत,” अशी माहिती बीजेडी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. आगामी काळात बीजेडी पक्ष त्यांना पाठिंबा देणारे मतदार, महिलांचे स्वयंसहायता गट, शेतकरी, शहरातील गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक, आदिवासी, तरुण यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
२ ऑक्टोबर रोजी वार्षिक पदयात्रेला सुरुवात होणार
या बैठकीनंतर बीजेडी पक्षाचे उपाध्यक्ष देबी प्रसाद मिश्रा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पक्षाचे काम पुढे घेऊन जाण्यावर या बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या नेत्यांना काही कामे देण्यात आली आहेत. येत्या २ ऑक्टोबर रोजी वार्षिक पदयात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी काही सूचना दिल्या,” अशी माहिती मिश्रा यांनी दिली.
आगामी वर्षात ओडिसा राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसह विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपा पक्षानेदेखील आपल्या विस्तारासाठी येथे प्रयत्न सुरू केले आहेत. येथे काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००० साली काँग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.
अमित शाहांच्या टिप्पणीमुळे भाजपाची अडचण?
दरम्यान, भाजपा येथे विस्तारासाठी प्रयत्न करत असला तरी गेल्या काही दिवसांत भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी बीजेडीचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्या कामाची स्तुती केली होती. अमित शाह यांनी पटनाईक यांची स्तुती केल्यामुळे ओडिसातील भाजपाच्या नेत्यांची अडचण झाली आहे. अमित शाह यांच्या याच विधानाचा आधार घेत बीजेडीचे नेते भाजपाला पाठिंबा देणाऱ्या जनतेची मते स्वत:कडे वळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या येथे भाजपाची चिंता वाढली आहे.
पटनाईक सरकारविरोधात राज्यभर मोहीम राबवली जाणार
दुसरीकडे भाजपा आणि बीजेडी हे पक्ष एकमेकांना पुरक आहेत, अशी राजकीय मांडणी नेहमीच करण्यात आलेली आहे. याचाही फटका भाजपाला बसू शकतो. असे असले तरी अमित शाहांच्या टिप्पणीनंतर शांत झालेले येथील भाजपाच्या नेत्यांनी आता पटनाईक यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. येथे भाजपाकडून आगामी दोन महिन्यात पटनाईक सरकारविरोधात राज्यभर मोहीम राबवली जाणार आहे. येथे भाजपाचे नेते पटनाईक सरकारच्या काळात कथित भ्रष्टाचार, कुशासन, अकार्यक्षमता, सरकारी यंत्रणांचा चुकीचा वापर समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
भाजपा १०८ मुद्द्यांवरून बीजेडी सरकारला घेरणार
भाजपा पक्षाकडून लवकरच बीजेडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी १०८ मुद्दे असणारे एक पत्रक काढले जाणार आहे. यामध्ये खाणकामातील कथित भ्रष्टाचार, प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित घोटाळा, पुरी जगन्नाथ मंदिरातील खजाना, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या स्वीय सहाय्यकाचा हेलिकॉप्टरने प्रवास अशा मुद्द्यांवरून नवीन पटनाईक यांना लक्ष्य केले जाणार आहे. २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात भाजपा ओडिसा राज्यात पदयात्रेचे आयोजन करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नवीन पटनाईक सरकारच्या कथित अपयशाला जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
बीजेडी, भाजपाला पर्याय असल्याचे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
दुसरीकडे काँग्रेस हा पक्षदेखील बीजेडी आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी आम्हीच योग्य पर्याय आहोत, असे मतदारांना सांगणार आहे. ओडिसाचे माजी मुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे गिरिधर गामांग तसेच अनेक माजी आमदार आणि खासदार काँग्रेस पक्षात परतणार आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. काँग्रेस पक्षाला २०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीत २५.७ टक्के मतं मिळाली होती. २०१९ साली हीच मते १७ टक्क्यांपर्यंत घसरली. तसेच लोकसभा निवडणुकीत या पक्षाला २०१४ साली २६.४० टक्के मतं मिळाली होती. २०१९ साली ही मतं १६.१० टक्क्यांपर्यंत घसरली. त्यामुळे येथे काँग्रेसकडून नव्याने पक्ष बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.