West Bengal Loksabha Election पश्चिम बंगालमध्ये १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. १३ वर्षांपासून राज्यात ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. त्याला धक्का न लागता, पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा तृणमूलचा प्रयत्न आहे. तर, भाजपादेखील निवडणुकीत बरोबरीची टक्कर देण्याची तयारी करीत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा तृणमूल आणि भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने राज्याच्या ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपाचा हा आकडा पार करण्याचा प्रयत्न असणार आहे.
१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी या तीन जागांचा समावेश आहे. २०१९ मध्ये या तीनही जागा भाजपाने जिंकल्या होत्या. २०११ पासून राज्यात सत्तेवर असलेल्या तृणमूलच्या जागा कमी करण्यासाठी या निवडणुकीतदेखील भाजपाला या जागा जिंकणे आवश्यक आहे.
अलीपुरद्वार
पंतप्रधानांमुळे पक्षांतर्गत मतभेद दूर
अलीपुरद्वारमध्ये भाजपाने विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला यांना डावलून मदारीहाटचे आमदार मनोज तिग्गा यांना तिकीट दिले आहे. चेहरा बदलल्याने मतदारांमधील उत्साह द्विगुणीत होईल, अशी आशा पक्षाला आहे. उमेदवारी नाकारल्याने बारला यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, ९ एप्रिलपासून ते तिग्गा यांच्याबरोबर प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक युनिटमधील अंतर्गत मतभेद मिटविण्याच्या प्रयत्नाला भाजपाला यश मिळाले आहे. बारला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ एप्रिल रोजी कूचबिहार आणि जलपाईगुडीमधील धुपगुरी येथील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अलीपुरद्वार युनिटमधील मतभेद दूर करण्यात पंतप्रधानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : पश्चिम बंगालमधल्या तीन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या; कूचबिहार कोण जिंकणार?
स्थानिक नेत्यांचा संयुक्तपणे प्रचार
पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी बारला यांनी सोमवारी तिग्गा यांच्याबरोबर बैठक घेण्यातही पुढाकार घेतला. टीएमसी उमेदवाराचा सामना करण्यासाठी शुक्रवारी राज्यसभा सदस्य प्रकाश बराईक, तिग्गा व बारला यांनी टोटो पारा, बंदपानी व लंकापारा येथील चहाच्या मळ्यात संयुक्तपणे प्रचार केला. बारला म्हणाले, “भाजपा हे एक मोठे कुटुंब आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडणं सामान्य आहे. मी आता मनोज तिग्गा यांच्यासाठी प्रचार करण्याचं ठरवलं आहे. कारण- मी अलीपुरद्वार जिल्ह्याचा संरक्षक आहे.” पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिग्गा यांनी मात्र या प्रकरणावर भाष्य करणे टाळले.
नेपाळी आणि आदिवासी समुदायाचे वर्चस्व
अलीपुरद्वार येथे नेपाळी आणि आदिवासी समुदायाचे वर्चस्व आहे. अलीपुरद्वारमधील मदारीहाट भागातून दोनदा आमदार म्हणून विजयी झालेल्या तिग्गा यांनी, लोकसभा निवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अलीपुरद्वारमधील टीएमसी नेते सौरव चक्रवर्ती यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “२०१४ नंतर पहिल्यांदाच आम्ही अलीपुरद्वारमधील आमच्या लढ्यात एकत्र आलो आहोत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही येथे बराच वेळ दिला आहे. टीएमसी सरकारने अलीपुरद्वारला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केले आणि परिसराचा विकास केला आहे. त्यामुळे यावेळी आम्ही जिंकू.”
जलपाईगुडी
गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जलपाईगुडी जिल्ह्याला एका अनपेक्षित चक्रीवादळाचा तडाखा बसला; ज्यामुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे, असे वचन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि आठ तासांत त्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु, त्यांच्या भेटीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच, भाजपा आयटी सेलचे प्रमुख व बंगालचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले होते.
त्यावर मुख्यमंत्र्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि आरोप केला की, आपत्तीत इतके नुकसान झाले. त्याला कारण- केंद्र सरकार आवास योजना-ग्रामीण यांतर्गत मिळणारी देय रक्कम राज्याला देत नाही. त्यांनी दावा केला की, जर नुकसानग्रस्त भागातील लोक काँक्रीटच्या छताखाली राहत असते, तर त्यांनी अवघ्या काही मिनिटांत सर्व काही गमावले नसते.
भाजपा आणि टीएमसी उमेदवारांचा प्रचार
टीएमसीचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय आणि भाजपाचे उमेदवार जयंता कुमार रॉय हे दोघेही त्यांच्या त्यांच्या प्रचारसभांमध्ये जलपाईगुडीच्या विकासाचा मुद्दा अधोरेखित करताना दिसत आहेत. टीएमसीचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय राज्य सरकारच्या योजनांबरोबर सरकार उत्तर बंगालच्या विकासाला कसे महत्त्व देत आहे, यावर भर देताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपाचे उमेदवार जयंता कुमार रॉय असा दावा करीत आहेत की, संसदेत जलपाईगुडीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करणारे ते पहिले खासदार आहेत.
जयंता रॉय म्हणाले, “केंद्र सरकारने जलपाईगुडीमध्ये अभूतपूर्व विकासकामे केली. विशेषतः रेल्वेची विकासकामे. हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी केले आहे आणि लोक त्यासाठी भाजपाला मतदान करतील.“ परंतु, जलपाईगुडीचे टीएमसी नेते तपन बॅनर्जी यांनी आरोप केला की, “जयंता रॉय लोकांना मूर्ख ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व काम रेल्वे खात्याने केले होते हे लोकांना माहीत आहे. त्यात त्यांचे किंवा पंतप्रधानांचे कोणतेही योगदान नाही.”
कूचबिहार
कूचबिहारमध्ये भाजपाचे उमेदवार निशिथ प्रामाणिक यांचा सामना टीएमसीचा उदयोन्मुख चेहरा असलेले जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांच्याशी आहे. त्यामुळे इथे दोन राजवंशी चेहरे आमने-सामने आहेत. अलीपुरद्वारप्रमाणेच येथेही भाजपाचे राज्यसभा खासदार व स्थानिक राजवंशी चेहरा अनंता महाराज पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात उभे ठाकल्याने भाजपाला अडचणींचा सामना करावा लागला होता. अनंता महाराज कूचबिहारला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करीत आहेत. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांनी कूचबिहारला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात राजवंशी भावनांचा मुद्दा भाजपा आणि तृणमूल या दोन्ही पक्षांना भेडसावत आहे. आता टीएमसी नेते बंशी बदन बर्मन म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी राजवंशी भाषेला मान्यता दिली. राजवंशी भाषा अकादमीची स्थापना केली. भवैया लोककलाकारांना भत्ता आणि २०० संघटित राजवंशी शाळांना मान्यता दिली. भाजपाने राजवंशींसाठी काहीही केले नाही. राजवंशींनी प्रामाणिक यांना मते का द्यावीत?” तर, यावर प्रामाणिक म्हणाले, “सर्व राजवंशी माझ्याबरोबर आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास झाला आहे. त्याचा फायदा कूचबिहारच्या लोकांनाही होईल, हे त्यांना माहीत आहे.”