महेश सरलष्कर
हिमाचल प्रदेशच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उमेदवाराकडे बघू नका, कमळ पाहून बटन दाबा’, असे आवाहन मतदारांना केले होते. हे आवाहन म्हणजे सत्ता राखण्यासाठी निक्षून केलेला भाजपचा अखेरचा प्रयत्न असल्याचे दिसत होते. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता गमावली असून ‘रिवाज’ बदलण्याचे भाजपने केलेले आवाहनही मतदारांनी धुडकावून लावले आहे. या छोट्या राज्यातील पराभवामागे पक्षातील बंडखोरी हेच प्रमुख कारण असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाल्यामुळे भाजपने तातडीने सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी बैठकांची मालिका सुरू केली होती. राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना शिमल्याला पाठवून भाजपच्या विजयी बंडखोरांना पुन्हा भगव्या झेंड्याखाली आणण्याची रणनीती तयार केली गेली होती. काँग्रेस आणि भाजपमधील अटीतटीच्या लढाईमुळे बहुमतासाठी भाजपला दोन-चार जागा कमी पडल्या तर, भाजपचे विजयी बंडखोर ‘किंगमेकर’ ठरले असते. ६८ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ३५ चा आकडा पार करावा लागणार होता. पण, काँग्रेसने निर्विवाद यश मिळवल्याने हे डावपेचही फोल ठरले. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपला २६ जागांवर समाधान मानावे लागले.
२०१७ मध्ये भाजपने प्रेमकुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली पण, मोदी-शहांनी मुख्यमंत्रीपदी बलाढ्य धुमल यांना बाजूला करून सौम्य स्वभावाच्या जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री केले. ठाकूर हे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे निष्ठावान मानले जातात. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील भाजप हा ठाकूर आणि धुमल गटात विभागला गेला. नाराज धुमल यांनी या विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवार उभे केल्याचे सांगिले जाते. त्यातील किमान दहा बंडखोरांनी भाजपच्या उमेदवारांना पराभूत केल्याचा अंदाज आहे. बंडखोरीचा जबर फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच मोदींनी उमेदवार न पाहता मतदान करण्याचे आवाहन केले होते.
गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत महागाई-बेरोजगारी या दोन्ही समस्यांचा फटका बसल्याने चारही जागांवर भाजपचा पराभव झाल्याची कबुली ठाकूर यांना द्यावी लागली होती. या विधानसभा निवडणुकीतही याच दोन्ही समस्यांनी भाजपला पराभूत केल्याचे दिसते. मतदारांनी इशारा देऊनही मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना राज्यातील समस्या सोडवता आल्या नाहीत. सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा वाढत गेल्या. लष्करातील सैनिकभरतीच्या महत्त्वाकांक्षी ‘अग्निवीर’ योजनेमुळेही तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांच्याच राज्यात भाजपला पराभूत व्हावे लागले असून विद्यमान सात कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना पराभव झाला आहे. भाजपने हिमाचल प्रदेशमध्येही अमित शहा, राजनाथ सिंह, अनुराग ठाकूर, योगी आदित्यनाथ अशा दिग्गज्जांना प्रचारात उतरवले होते. पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे इथेही झंझावाती दौरे केले होते. पण, बंडखोरी शमवण्यात यश न आल्याने हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांचा रिवाज भाजपला बदलता आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.