बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ यांचे बोलविते धनी कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेषत: अजित पवार यांच्या गटात भाजपच्या या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. गेले काही दिवस आमदार धस हे दररोज मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत. देशमुख यांच्या हत्येचा कट मुंडे यांच्या बंगल्यावर शिजल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. आमदार धस यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दुसरीकडे, बीडमध्ये जाऊन मुंडे यांना लक्ष्य करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या पाठीशी भाजपची मंडळी उभी असल्याचे चित्र निर्माण झाले. अंजली दमानिया यांना धमक्या देणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई. करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्र दिले. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे.
हेही वाचा >>> Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या जुंपली आहे. आमदार सुरेश धस हे मुंडे यांच्या विरोधात दररोज आरोप करीत असताना भाजपकडून त्यांना रोखले का जात नाही, असा सवाल केला जात आहे. ‘मी धस यांच्याशी बोललो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगतात तरीही धस गप्प का बसत नाहीत, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल आहे. धस यांच्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महायुतील घटक पक्षाच्या मंत्र्याला लक्ष्य करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या मदतीला भाजपच्या आमदार चित्रा वाघ धावून गेल्या. याबद्दलही राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे.
हेही वाचा >>> दिल्ली निवडणुकीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी?
संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्टच आहे. वास्तविक बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. अजित पवार हे भाजपबरोबर आले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे तेवढे ऐक्य झालेले नाही, असे सांगण्याच येते. आमदार सुरेश धस यांच्याकडून दररोज होणारे आरोप, भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी तत्परता हे सारे लक्षात घेता या दोघांचा बोलविता धनी कोण, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. भाजपने राजीनाम्यासाठी मुंडे यांच्यावर दबाव वाढविला आहे. त्याचाच भाग म्हणून धस, वाघ यांनी भूमिका घेतल्याचे बोलले जाते.