छत्रपती संभाजीनगर : ‘बटेंगे तो कटेंगे’ ही भाजप समर्थकांची भूमिका ‘एमआयएम’कडूनही जशास तशी मांडली जात आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघांमध्ये मुस्लिमांमध्ये मतांचे विभाजन व्हावे म्हणून जवळपास २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील बहुतांश अर्ज भाजचे उमेदवार अतुल सावे यांनी भरायला लावले असल्याचा आरोप ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नुकतेच नारेगाव येथील त्यांच्या सभेत केला. सावध रहा, मतांमध्ये फूट पडली तर आपण पराभूत होऊ असा इशारा ते देत होते. लोकसभेतील जलील यांच्या प्रचारात दिसणाऱ्या भगव्या टोप्या आता गायब झाल्या आहेत. या वेळी ‘ एमआयएम’ ची पहिली जाहीर सभा अकबरोद्दीन ओवेसी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत सर्वाधिक ११० अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये १३ अर्ज बाद करण्यात आले तर एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघात ‘भाजप’ आणि ‘एमआयएम’ याचा प्रचार ‘बटेगें तो कटेंगे’ या समपातळीवर आला आहे. या वेळी जलील यांच्या प्रचाराचा रंगरुप बदलेल असा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी अन्य धर्मीय मतांची निकड असल्याने आदर्श पतसंस्था गैरव्यवहारातील पिडीत व्यक्तींना बरोबर घेत ‘एमआयएम’ चा प्रचार काही मवाळ केला होता.

आणखी वाचा-भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून गफ्फार कादरी तसेच वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अनेक मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरावेत अशी रणनीती आखण्यात आली आहे. ही रणनीती भाजपने आखली असल्याचा दावा खासदार जलील यांनी केला. या मतदारसंघात कॉग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलेला. माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांची उमेदवारी बदलल्याने मराठवाड्यातील ‘ मराठा- ओबीसी’ मतांचा फटका भाजपचे उमेदवार अतुल सावे यांना बसला असता. मात्र, आता ती शक्यता कमी असली तरी या मतदारसंघात जरांगे यांचा उमेदवार असेल का, ती व्यक्ती कोण यावरही पुन्हा निवडणुकीमधील गणिते बदलली जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’

लोकसभा निवडणुकीत गायब असणारे अकबरोद्दीन मैदानात

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मवाळ चेहरा लक्षात घेता अकबरोद्दीन ओवेसी यांची औरंगाबादमध्ये सभा झाली नव्हती. या वेळी ‘आ रहा हूँ औरंगाबाद’ असे म्हणत अकबरोद्दीन यांची सभा पाच नोव्हेंबर रोजी शहरातील ‘आमखास’ मैदानावर होणार असल्याचे ‘एमआयएम’ च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.