कविता नागापुरे
भंडारा : राज्याच्या राजकारणात परस्परांची कोंडी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीने भंडार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सरळसरळ युती केली आहे. देश किंवा राज्यपातळीच्या राजकारणात भाजप पक्ष मतदारांना प्रभावित करण्यात यशस्वी होत असला तरी स्थानिक पातळीवर विशेषतः सहकार क्षेत्रात मात्र भाजपची मतदानाची टक्केवारी नगण्य आहे. या क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढणे आणि जिंकणे भाजपच्या आवाक्याबाहेरचे आहे. शिवाय, इतर पक्षातील अंतर्गत कुरबुरींचा फायदा घेण्यात भाजपचा हातखंडा आहेच.
राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे यांच्या भांडणाचा फायदा उचलत भाजपने सत्ता स्थापन केली. तेच सूत्र भाजप स्थानिक पातळीवरही लावू पाहत आहे. म्हणूनच नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील अंतर्गत मतभेद व वैमनस्याचा फायदा घेत भाजपने राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा डाव खेळला आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे जिल्हा परिषद असो किंवा बाजार समित्यांच्या निवडणुका ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा’ होऊ शकतो, हे मात्र नक्की. शिवाय ‘बाजार समितीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर नसतात, त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असतात’, असे म्हणणाऱ्या माजी आमदार. परिणय फुके यांच्या जिल्ह्यात वाऱ्या, सभा आणि मुक्काम मात्र वाढले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने फुके यांना पटोलेंना कोंडीत पकडण्याची आणि त्यांच्याच जिल्ह्यात त्यांना तोंडघशी पाडण्याची सुवर्णसंधी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळेच की काय फुके यांची बाजार समितीसारख्या निवडणुकीतही रुची निर्माण झाली आहे. ही निवडणूकसुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे.
हेही वाचा >>> सांगली भाजपमध्ये खासदारांच्या विरोधात नाराजीचा सूर
एकीकडे ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे ‘जिल्ह्यातच काय तर देशातही काँग्रेस भाजपसोबत युती करणार नाही’, असे नाक वर करून सांगणाऱ्या पटोलेंच्या काँग्रेस पॅनलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यालाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही पटोलेंनी हेच दुटप्पीपणाचे राजकारण केले होते. गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून भाजपसोबत युती केल्याचा वचपा काढण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेत पटोलेंनीसुद्धा त्यांच्या कट्टर विरोधक असलेल्या भाजपसोबत हातमिळवणी केली होती. पटोलेंच्या या दुटप्पी वागण्यामुळे इतर पक्षांच्या हातात आयते कोलीत मिळतेच, मात्र स्थानिक कार्यकर्तेही दुखावतात. याचा परिणाम निवडणुकांवर होतो.
जिल्ह्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची समीकरणे यावरून जुळवली जातात. राज्यात महविकास आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र काँगेस आणि राष्ट्रवादीचे काही केल्या जुळत नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तयारच असतात. खरे तर भल्या पहाटे पावरांसोबत शपथविधी पार पाडणारे फडणवीस यांनी दीड दिवसाचे सरकार कोसळल्यावर ‘राष्ट्रवादीसोबत युती ही भाजपची सर्वात मोठी चूक होती’, असे जाहीरपणे बोलून दाखवले होते. तोच भाजप आता स्वःहितासाठी राष्ट्रवादीचा हात पकडत आहे.