राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पुणे शहर व जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे प्रतिस्पर्धी होते, पण आता एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडून येणे कठीणच दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालपर्यंतच्या कट्टर राजकीय दुष्मनांशी हातमिळवणी करण्याची वेळ आल्याने पुणे शहरातील चार आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत रस्सीखेच आणि कुरबुरी होण्याची शक्यता आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे आणि बाळा भेगडे; तसेच खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दिग्गज नेत्यांपुढे प्रश्न निर्माण होणार आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीतील बंडामुळे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणार

लोकसभा निवडणुकीमध्येही पुणे, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांबाबत काय निर्णय घ्यायचा आहे, याबाबत तिन्ही पक्षांपुढे प्रश्न उभा राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा झालेला पराभव हा अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी नाकारून अजित पवार त्या पराभवाचा वचपा काढणार का, याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि पर्वती या चार मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे आव्हान असणार आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे आजपर्यंतचे प्रतिस्पर्धी होते. गेल्या निवडणुकीत मुळीक यांचा टिंगरे यांनी पराभव केला होता. आता दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

हेही वाचा – विरोधी पक्षनेते फुटण्याची राज्यात परंपराच पडली

हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात स्पर्धा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे इच्छुक उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात या मतदारसंघात संघर्ष पाहायला मिळायची शक्यता आहे.

खडकवासला मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कायम स्पर्धा राहिली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हक्क सांगितला जाऊ शकतो. पर्वती मतदारसंघातही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कायम लढत राहिली आहे.

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांपुढे प्रश्न

पुणे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापैकी काहीजण हे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकेकाळचे जिवलग मित्र. मात्र, त्यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. त्यांना पुन्हा मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत. आढळराव पाटील सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असल्याने इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र आजवर राहिले आहे. या मतदारसंघातील आमदार दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यापैकी कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न आगामी काळात उभा राहणार आहे. भरणे हे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जातात. दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल कुल आणि अजित पवार यांच्यात सख्य नाही. त्यामुळे दोघे एकमेकांशी कसे जुळवून घेणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय दुष्मन समजले जातात. त्यांच्यात मैत्री घडवून आणणे, हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात कायम शाब्दिक यद्ध सुरू असते. शिवतारे यांना आता पवार यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. मात्र, शिवतारे यांचे आरोप पवार हे विसरणार की त्याचे उट्टे काढणार, याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत.

पिंपरी-चिंचवड पवार ताब्यात घेणार का?

पिंपरी-चिंचवड शहर हे आजवर अजित पवार यांच्या ताब्यात होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे अनेक साथीदार भाजपमध्ये गेल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेवरील सत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली होती. आता भाजपशी अजित पवार यांनी हातमिळवणी केली असल्यामुळे जुने सहकारी एकत्र येऊन पिंपरी-चिंचवड पुन्हा अजित पवार यांच्या ताब्यात जाणार का, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता असणार आहे.

हेही वाचा – काँग्रेसला अजून तरी फुटीचे ग्रहण नाही

लोकसभा निवडणुकीतही होणार संघर्ष?

पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघावर यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याच्या शक्यतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली होती. आता
भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीचा दावा कायम ठेवणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा अजित पवार हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी नाकारून काढणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीतही उमेदवारी देण्याचे यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे. डॉ. कोल्हे हे भाजपच्या संपर्कात असल्याचीही सतत चर्चा होत असते. मात्र, या मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक आहेत. आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and ncp used to be rivals in pune district but even though they have come together reconciliation between leaders of both parties seems difficult print politics news ssb
Show comments