नागपूर : भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू असतानाच शिंदे गटाचे नागपूर जिल्ह्यातील आमदार कृपाल तुमाने यांनी मटणासंदर्भातील वादग्रस्त विधानावरून राज्याचे मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांना खडे बोल सुनावले आहे. मटण विक्रेत्यांना प्रमाणपत्र देणारे राणे होतात कोण ? असा सवाल त्यांनी केला. तुमाने खाटिक समाजाचे प्रतिनिधीत्व करतात हे येथे उल्लेखनीय.
हिंदूकडूनच मटन खरेदी करावे, मल्हार प्रमाणपत्र असवणाऱ्यांकडूनच मांस खरेदी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य राणे यांनी केले होते. त्या विरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षासोबतच मित्र पक्षाकडूनही आता राणेंना लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटाचे विदर्भातील आमदार कृपाल तुमाने यांनीही राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली .
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या समाजात संतापाची भावना आहे. मल्हार प्रमाणपत्राची राणेंची सूचनाही या समजाने फेटाळून लावली आहे. आत्तापर्यत जी पूर्वापार पद्धत सुरू आहे, तीच पुढेही कायाम ठेवावी, असे मत तुमाने यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. तुमाने म्हणाले, मल्हार प्रमाणपत्र देणारे राणे कोण ? ही सरकारची भूमिका आहे काय ? तसेअसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली जाईल. कोणत्याही देवी-दैवतांच्या नावाने प्रमाणपत्र देणेच मुळात चूक आहे, असे त्यांना सांगितले जाईल.
नितेश राणे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रथमच शिंदे गटाच्या विदर्भातील आमदाराने तीव्र स्वरुपाची प्रतिक्रिया दिली आहे. देणे याला महत्व आहे. राणे जसे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात तसेच तुमाने सुद्धा शिंदेचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदेसोबत जाणाऱ्या खासदारांमध्ये तुमाने अग्रस्थानी होते. मात्र त्याना लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातूनभाजपच्या सूचनेवरून शिंदे यानी उमेदवारी नाकारली होती. पण विद्यमान खासदार असताना तुमाने यांनी हा निर्णय मान्य केला होता. नंतर शिंदे यांनी तुमाने यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन केले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता तुमाने यांची राणेंच्या वक्तव्या विरोधातील प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही, असे राजकीय वर्तुळात मानले जाते. नितेश राणे फडणवीस यांना खुश करण्यासाठी वादग्रस्त विधाने करीत असले तरी त्यांचे मोठे बंधू निलेश राणे हे शिंदे गटाच आमदार आहेत, त्यामुळे राणेंनी आपल्या बंधूची अडचण करू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या एका नेत्यो दिली.